
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ‘सुंदर माझा दवाखाना अभियाना’स प्रारंभ झाला. यात सर्व 98 प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच 555 उपकेंद्रांची साफसफाई अधिकारी, तसेच आरोग्य कर्मचार्यांनी केली. यापुढे दर शनिवारी जिल्हाभर हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याने आगामी वर्षभर जिल्ह्यातील झेडपीचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे चकाचक राहणार आहेत.
दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. समान आरोग्य सेवा हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. शासकीय रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यावर्षी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत सुंदर माझा दवाखाना हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शुक्रवारी (दि.7) या अभियानास प्रारंभ झाला. या अभियानांतर्गत अधिकारी, कर्मचार्यांनी साफसफाई केली. अभियानांतर्गत दर आठवड्याला शनिवारी दवाखान्यात साफसफाई, परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य सुविधेची गरज असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी यावे, यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. यात श्रमदानातून आरोग्य संस्थांमध्ये साफसफाई, शक्य असल्यास दवाखान्यांची रंगरंगोटी करण्याचे नियोजन आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत 98 प्राथमिक आरोग्य केंद्र व 555 उपकेंद्र आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांनी दवाखान्यांची साफसफाई केली.