
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता येत्या जुलै महिन्यांत आंतरजिल्हा बदल्यांची शक्यता आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदल्यांबाबत नवीन शासन निर्णय काढला असून त्यानुसार जुलै महिन्यात आंतरजिल्हा बदल्यांची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी श्रेणी दोन, विस्तार अधिकारी श्रेणी तीन यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच होणार असून या प्रवर्गातील 205 जणांना पदोन्नती देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यात मागील महिन्यांत जिल्हातंर्गत प्राथमिक शिक्षकाच्या बदलीचा विषय मार्गी लागला असून येत्या शैक्षणिक वर्षापासून संबंधीत बदली झालेल्या शिक्षकांना त्यांना नव्याने बदलीच्या ठिकाणी नेमणुकीच्या शाळेवर हजर व्हावे लागणार आहे. गुरूजींना जिल्हातंर्गत बदल्यानंतर आता आंतरजिल्हा बदलीचे वेध लागले आहेत. आंतरजिल्हा बदलीसाठी ग्रामविकास विभागाने 23 मे 2023 ला नवीन शासन निर्णय काढला असून यात या संवर्गातील शिक्षकांच्या बदल्याबाबत सुस्पष्ट धोरण ठरवून दिले आहेत. त्यानूसार आंतरजिल्हा अधिकारी आणि संबंधीत जिल्हा परिषदेची एनओसी मिळाल्यानंतर संबंधीत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे.
दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षक संवर्गातील पात्र उपाध्यपक, पदवीधर आणि मुख्याध्यापक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानूसार या कार्यरत शिक्षकांपैकी सेवा ज्येष्ठतेनूसार शिक्षक मुख्याध्यापक पदावर 5 वर्षे सेवेचा अनुभव, बीएडच्या शिक्षण अर्हातेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जादा गुण असणार्या उपाध्यपक, मुख्याध्यापक यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. यात 171 मुख्याध्यपक, उर्दु विभागाचे 6 मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी सवंर्ग दोन 12 आणि विस्तार अधिकारी संवर्ग तीन 25 अशा 205 जणांचा समावेश आहे. या सर्वांना पदोन्नती देण्यात आल्यावर संबंधीतांना एक वेतन वाढ मिळणार असून त्यांच्या वेतनात देखील सुधारणा होणार आहे, तसेच पदस्थापना बदलणार आहे.
पदोन्नतीनंतर कोर्ट केसेसची सोय
उपाध्यापक, मुख्याध्यापक यांच्या पदोन्नतीनंतर कोर्टात गेल्यामुळे ऑनलाईन बदलीमध्ये अर्ज करता न असलेले, कोर्टाने संबंधीत शिक्षकांची सोय करावी, असे आदेश दिलेल्या शिक्षकांना तालुकानिहाय रिक्त जागेनूसार नेमणुका देण्याची प्रक्रिया होणार आहे. मात्र, ही प्रक्रिया मुख्याध्यापक यांच्या पदोन्नतीनंतर होणार असल्याचे सांगण्यात आले.