17 मे पासून झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्या

सामान्य प्रशासन विभागाची तयारी पूर्ण : दहा टक्के प्रशासकीय आणि दहा टक्के विनंती बदल्या
17 मे पासून झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्याबाबत मार्गदर्शन आले असून त्यानूसार यंदा दहा टक्के प्रशासकीय आणि दहा टक्के विनंती बदल्या होणार आहेत. दरम्यान, पुढील आठवड्यात 17 पासून कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली.

मे महिन्यांत साधारणपणे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्याची प्रक्रिया राबविण्यात येते. सामान्य प्रशासन विभागाने मागिल महिन्यांत कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी सेवा ज्येष्ठतेनूसार याद्या प्रसिध्द करून त्यावर हरकती आणि सुनावणी घेवून बदली पात्र कर्मचार्‍यांची यादी फायनल करून ठेवलेल्या आहेत. तसेच ग्रामविकास विभागाच्या बदल्यांच्या प्रक्रियेसाठी मार्गदर्शनाची प्रतिक्षा होती. ग्रामविकास विभागाकडून मार्गदर्शन आल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने प्रत्यक्षात आता बदलीसाठी विभागानिहाय वेळापत्रक जाहीर केले आहे.

या वेळापत्रकानूसार येत्या 17 तारखेपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी 10 ते 11.30 या कालावधीत सामान्य प्रशासन विभाग, त्यानंतर दुपारी 12.30 पर्यंत अर्थ विभाग तर दुपारी 1 वाजेपर्यंत कृषी विभागातील कर्मचार्‍यांची बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजपर्यंत महिला बालकल्याण, अडीच वाजेपर्यंत पशूसंवर्धन विभाग, 3 वाजता लघू पाटबंधारे विभाग, 3.30 वाजेपर्यंत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, 4.30 पर्यंत बांधकाम विभाग या विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत.

18 तारखेला दिवसभर आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. तर 19 तारखेला प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ग्रामपंचायत विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहे. अशा प्रकार तीन दिवसांत जिल्हा परिषदेच्या बदली पात्र कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषदेत नव्याने सीईंओ म्हणून आशिष येरेकर यांनी पदभार स्वीकाराला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बदल्यांची प्रक्रिया होणार आहे.

बदल्यांच्या वेळी कोविडचा प्रसार होवू नयेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात समुपदेशनासाठी बदली पात्र कर्मचार्‍यांना उपस्थितीत राहता येणार आहे. सर्व खातेप्रमुखांनी अंतिम सेवाज्येष्ठता दिलेल्या मुदतीत जिल्हा परिषद संकेतस्थळावर प्रसिध्द करावी, प्रशासकीय आणि विनंती बदल्यांसाठी पात्र कर्मचार्‍यांनी शासन निर्णयामधील बदली धोरणानूसार सुट मिळावी, यासाठी विनंती केलेली असल्यास कागदपत्रांची खातरजमा संंबंधीत खाते प्रमुखांनी काटेकोर पध्दतीने करावी. बदल्यांसाठी विनंती आणि आपसी संवर्गासाठी 25 एप्रिलपर्यंत प्राप्त झालेले अर्ज संबंधीत खातेप्रमुखांनी, गटविकास अधिकार्‍यांनी घ्यावेत आणि ते जिल्हा परिषदेला सादर करावेत. अंपग कर्मचार्‍यांना ज्या प्राधिकारणाकडून प्रमाणपत्र मिळालेेले आहे, त्याची पडताळणीची जबाबदारी संबंधीत खाते प्रमुखांची राहणार आहे.

Related Stories

No stories found.