
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दरवर्षी मे महिना आला की जिल्हा परिषद कर्मचार्यांना बदल्यांचे वेध लागतात. यंदा देखील मे महिन्यांत झेडपी कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून यासाठी 8 ते 12 मे या दरम्यान प्रक्रिया होणार होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवार दि. 9 ते 12 मे असा बदल्यांचा कालावधी निश्चित केला आहे.
त्यानूसार कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया या दरम्यान पारपडणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांचे विभागनिहाय वेळा पत्रक तयार केले असून पहिल्याच दिवशी सामान्य प्रशासन, शिक्षण आणि कृषी विभागातील कर्मचार्यांची बदल्यांची प्रक्रिया पारपडणार आहे.
जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक वगळता सुमारे 3 हजारांच्या जवळापास कर्मचारी आहेत. दरवर्षी ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार यातील बदली पात्र कर्मचार्यांची 10 टक्के प्रशासकीय आणि 10 टक्के विनंती बदल्या करण्यात येतात. कर्मचार्यांचा बदल्याचा विषय हा अतिशय संवेदनशील असल्याने प्रशासन सावधपूर्वक बदल्यांचा विषय हाताळत असतात.
बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने 18 एप्रिल रोजी बदली पात्र कर्मचार्यांची प्रारूप ज्येष्ठता यादी प्रसिध्द केली होती. त्यानंतर 25 एप्रिलला सायंकाळी पाच वाजेपर्यंत बदली ठिकाणाचे विकल्प कर्मचार्यांकडून घेण्यात होते. शुक्रवार (दि.28) रोजी कर्मचार्यांनी दिलेल्या बदलीच्या ठिकाणांचे विकल्प, संबंधीतांचा विनंती अर्ज कागदपत्रांसह त्यात्या विभागाच्या प्रमुखांनी एकत्र करून सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केले होते. त्यानंतर 2 मे रोजी प्रारूप बदली पात्र कर्मचार्यांची यादी वरील आक्षेप आणि हरकती वर सुनावणी घेवून संवर्गनिहाय कर्मचार्यांची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली. आता या यादीनूसार विभागनिहाय कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी 9 ते 12 मे ही तारिख निश्चित करून बदलीसाठीचे विभागनिहाय वेळा पत्रक तयार करण्यात आले आहेत.
या वेळापत्रकानूसार पहिल्याच दिवशी सामान्य प्रशासन आणि कृषी विभागासह जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा विभाग असणार्या प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यानंतर बुधवार दि.10 रोजी अर्थ विभाग, ग्रामपंचायत विभागातील कर्मचार्यांच्या, गुरूवार दि.11 रोजी महिला बालकल्याण आणि पूशसंवर्धन विभाग, लघू पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि बांधकाम विभागासह शुक्रवार दि.12 रोजी आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत.
तालुका पातळीवर 16 ते 25 मे दरम्यान
जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 2014 ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानूसार पंचायत समिती पातळीवर तालुका अंतर्गात बदली पात्र कर्मचार्यांची बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी 16 ते 25 मे हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पंचायत समिती पातळीवर होणार्या बदल्यांची संपूर्ण जवाबदारी ही गटविकास अधिकारी यांच्यावर असते. त्या ठिकाणी देखील 10 विनंती आणि 10 टक्के प्रशासकीय बदल्या होतात.