
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कर्मचार्यांनी कामाच्या वेळा पाळाव्यात म्हणून शासनाने प्रत्येक जिल्हा परिषदेत बायोमेट्रिक प्रणालीवरच उपस्थिती नोंदविण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषदेतील बायोमेट्रिक प्रणाली विस्कळीत आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागकडे विचारणा केली असता झेडपीच्या मुख्यालयात कर्मचार्यांच्या हजेरीसाठी नवीन बायोमेट्रीक प्रणाली बसवण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषद मुख्यालयात 400 च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांच्या हजेरीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच चार बायोमेट्रिक मशीन लावलेल्या आहेत. यावरच सर्व कर्मचार्यांची हजेरी घेतली जात होती. मात्र, यात विस्कळीतपणा असल्यामुळे सामान्य प्रशासनाने या ठिकाणी नवीन प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या ठिकाणी बोटाव्दारे बायोमेट्रीक प्रणाली सुरू होती.
मात्र, आता नव्याने डोळे आणि चेहरा याव्दारे चालणारी बायोमेट्रीक प्रणाली बसवण्यात येणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत असणारी प्रणाली कालबाह्य झालेली असून त्याठिकाणी नवीन प्रणाली बसवण्यात येणार आहे. झेडपीत नवीन बायोमेट्रीक प्रणाली बसवण्यासाठी आवश्यक असणार्या मंजूर्या आणि प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. लवकर मुख्यालयात नवीन बायोमेट्रीक प्रणाली बसवण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी दिली.
अनेक ठिकाणी मशिन बंद
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या पंचायत समिती स्तरावर अनेक ठिकाणी बायोमेट्रीक प्रणाली बंद बसल्याची माहिती मिळाली. तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात बायोमेट्रिक बसवण्याच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी ही प्रणाली बसवलेली आहे; परंतु बहुतेक ठिकाणच्या मशीन बंदच आहेत. नुकत्याच झालेल्या चासनळी प्रकरणावरून डॉक्टर दवाखान्यात नसल्याचे समोर आले आहे.