
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचार्यांचे निलंबन केले असून इतरांवर वेतनवाढ रद्दची कारवाई करण्यात आली आहे. 9 डिसेंबरला सीईओंनी हे आदेश काढले.
प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक चंदा ढवळे यांच्यावर मागील महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने कारवाई केल्याने त्यांच्या निलंबनाचे आदेश सीईओंनी काढले. तसेच त्यांचे निलंबन काळातील मुख्यालय कोपरगाव करण्यात आले असून त्यांनी कोपरगाव गटविकास अधिकार्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असेही आदेशात म्हटले आहे.याशिवाय प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक चिमाजी धनवळे यांच्यावरही कर्तव्याचे पालन न करता गैरवर्तन केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांचे तात्पुरते मुख्यालय अकोले पंचायत समिती करण्यात आले आहे.
माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक विजयकुमार आल्हाट व एस.एन.घोडके यांची वेतनवाढ एक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. मध्यंतरी सीईओंनी एक समिती नेमून प्राथमिक व माध्यमिक शिक्षक विभागातील दफ्तर तपासणी केली होती. त्यात आल्हाट व घोडके यांच्यावर कार्यालयीन पद्धतीचा अवलंब न केल्याने हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आ जिल्हा परिषदेच्या शेवगाव पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रशांत देवळालीकर यांचे 22 मे 2018 ते 18 डिसेंबर 2018 असे 210 दिवसांचे निलंबन कायम करण्यात आले. या निलंबनाबाबतचा निर्णय प्रलंबित होता. कार्यालयीन कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे त्यांची वेतनवाढ तीन वर्षांपर्यंत राखून ठेवण्याची शिक्षा त्यांना देण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्याबाबतचा विषय प्रलंबित होता. त्यावर निर्णय होऊन हे निलंबन कायम करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील (दक्षिण) कनिष्ठ सहायक सुरेश चित्रांग यांची वेतनवाढ पुढील दोन वर्षांसाठी तात्पुरती बंद करण्यात आली. त्यांनी कार्यालयात असताना शासकीय दफ्तर अनाधिकाराने कार्यालयाबाहेरील त्रयस्थ व्यक्तीला हाताळण्याची परवानगी दिली. त्यावरून त्यांच्यावर हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. राहुरी पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक प्रवीण गागरे यांनी कामात गैरवर्तन केल्याने त्यांना मूळ वेतनावर आणण्याची कारवाई करण्यात आली.