जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणुकीचा बिगूल

सोमवारपासून अर्ज : 19 डिसेंबरला मतदान
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणुकीचा बिगूल
जिल्हा परिषद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

झेडपी कर्मचार्‍यांची आर्थिक कणा असणार्‍या जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. 19 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळातील कर्मचार्‍यांमधील राजकीय वातावरण तापणार आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था ही जिल्ह्यात नावाजलेली पतसंस्था आहे. शंभर टक्के वसूली असणार्‍या या संस्थेवर वर्चस्व राखण्यासाठी चढाओढ असते. सध्या श्री गणेश मंडळाची सत्ता असून त्यांनी मागील पंचवार्षिकला पावन गणेश मंडळाचा पराभव केला होता. या संस्थेच्या निवडणुकीसाठी नगर तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाळे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यांनी शनिवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

सोमवार, 15 नोव्हेंबर ते 22 नाव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दाखल होणार्‍या उमेदवारांची यादी दुपारी 3 नंतर त्याच दिवशी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. 23 तारखेला दाखल अर्जाची छानणी होवून 24 तारखेला वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 24 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत माघारीचा कालावधी आहे. 9 डिसेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून त्याच दिवशी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर दहा दिवसांनी 19 डिसेंबरला मतदान होणार असून त्यानंतर 20 तारेखला मतमोजणी होणार आहे.

असे आहे संचालक मंडळ

मुख्यालय 1, 14 तालुक्यातून प्रत्येकी एक प्रमाणे 14 संचालक, अनुसूचित जाती-जमाती 1, विमुक्त जाती 1, इतर मागासवर्गी 1 आणि महिला राखीव 2 असे 21 सदस्यांच्या संचालक मंडळासाठी निवडणूक होणार आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे नगर जिल्हा कार्यक्षेत्र आहे. सभासद संख्या 2 हजार 600 आहे. या संस्थेची वार्षिक उलाढाल 125 कोटी असून वसूली 100 टक्के आहे. जि.प.आरोग्य विभागातील कर्मचारी ज्या मंडळाला कौल देतात, त्या मंडळाची संस्थेवर सत्ता असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com