अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त 1 ते 17 ऑगस्टदरम्यान नगर जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी जिल्हा परिषदेच्या आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता आणि अन्य उपक्रमांविषयी जनजागृती करण्यासाठी रथ यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी आदींसह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग यांच्यावतीने जिल्ह्यातील गावागावांत पाणी व स्वच्छताविषयक जनजागृती करण्यासाठी स्वच्छता रथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर म्हणाले, गावागावांत स्वच्छता, शाश्वत व आरोग्यदायी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.
यासाठी स्वच्छ भारत मिशन, हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) जलजीवन मिशन शुध्द पाण्याची उपलब्धता, वैयक्तीक स्वच्छता, परिसर स्वच्छता, गावाची स्वच्छता, घर व अन्न पदार्थांची स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था घनकचर्याचे योग्य व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय याबाबत या स्वच्छता रथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी महालेखा व वित्त अधिकारी धनंजय आंधळे, महिला व बालकल्याण विभागाचे मनोज ससे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आनंद रुपनर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा रेश्मा होजगे, समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, उपअभियंता शिवाजी राऊत, श्रीकांत टेमकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोमनाथ भिटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.