
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून तिसर्या दिवशी महिला बालकल्याण, पशुसंवर्धन, लघूपाटबंंधारे, पाणीपुरवठा व बांधकाम विभाग अशा पाच विभागात एकूण 33 बदल्या झाल्या. दरम्यान, आतापर्यंत बदल्या झालेल्या कर्मचार्यांची संख्या अवघी 181 झाली असून आज आरोग्य विभागाच्या बदल्यांनी झेडपी कर्मचार्यांच्या बदल्यांचा समारोप होणार आहे.
जिल्हा परिषदेत वर्ग 3 व 4 च्या कर्मचारी बदल्यांची प्रक्रिया 9 मे पासून सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके बदल्यांच्या प्रक्रियेचे कामकाज पाहत आहेत. पहिल्या दिवशी 51, दुसर्या दिवशी 97 बदल्या झाल्यानंतर तिसर्या दिवशी 33 बदल्या झाल्या.
गुरूवारी महिला बालकल्याण विभागात अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या एकूण 8 बदल्या झाल्या. त्यात 6 प्रशासकीय, 2 विनंती बदल्या होत्या. पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक पदाच्या एकूण 14 बदल्या झाल्या. त्यात 6 प्रशासकीय व 9 विनंती होत्या. लघूपाटबंधारेमधील कनिष्ठ अभियंता पदाची एकच प्रशासकीय बदली झाली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातही कनिष्ठ अभियंत्याची एकच प्रशासकीय बदली झाली.
बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंत्याच्या 3 बदल्या (1 प्रशासकीय, 2 विनंती) झाल्या. तर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाच्या 6 बदल्या झाल्या. त्यात 1 प्रशासकीय व 5 विनंती बदल्या होत्या. आता 12 व 13 मे अशा दोन दिवस आरोग्य विभागातील बदल्या होणार आहे. हा विभाग मोठा असल्याने प्रशासन त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया दोन दिवस राबविणार आहे.
आतापर्यंत झालेल्या बदल्या
समान्य प्रशासन - 44, अर्थ विभाग - 6, कृषी विभाग- 1, ग्रामपंचायत - 77, शिक्षण - 20, महिला बालकल्याण - 8, पशुसंवर्धन -14, लघू पाटबंधारे - 1, पाणीपुरवठा -1, बांधकाम - 9 एकूण 181.
सीईओ येरेकर यांची धास्ती
बदल्याच्या पहिल्याच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बदलीसाठी आरोग्य, अपंग यासह अन्य प्रमाणपत्रांचा वापर करणार्या कर्मचार्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच यात चुकीची अथवा बनावट प्रमाणपत्रे सादर करणार्यांवर निलंबनासह गरज भासल्यास बडतर्फीची कारवाईचा इशारा दिला होता. याचा धसका कर्मचार्यांनी घेतला असून यामुळे मोठ्या संख्यने विनंती बदल्यांच्या वेळी कर्मचार्यांनी बदली नाकाराल्याची चर्चा आता कर्मचार्यांमध्ये झडतांना दिसत आहे.