झगडेफाटा ते तळेगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे

झगडेफाटा ते तळेगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे

मलमपट्टी किती दिवस, कायमस्वरुपी काम कधी करणार

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव-संगमनेर-पुणे या महत्वाच्या शहरांना जोडणारा झगडेफाटा ते तळेगाव या रस्त्याची खड्ड्यांमुळे अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. या रस्त्यावरचा प्रवास लोकांच्या जीवावर बेतणारा ठरत असून खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. या रस्ता दुरुस्तीकडे संबधित विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष झाले असून किती लोकांचे बळी घेतल्यानंतर हा रस्ता संबंधित विभाग दुरुस्त करणार आहे, असा प्रश्न या रस्त्याने नेहमी ये-जा करणार्‍यांना पडत आहे.

मागील दोन दिवस झालेल्या पावसाने तर या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. या रस्त्याला खूप मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहने कशी चालवावीत असा प्रश्न वाहन धारकांना पडत आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी साईडपट्टे राहिलेले नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यांमधून वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. चार ठिकाणी रस्त्याच्या पुलाची एक बाजुच्या भिंत अनेक दिवसांपासून पडून गेली आहे. वाहन कधीही रस्त्यावरून खड्ड्यात जाऊ शकते. सर्वात जास्त खड्डे हे गणपती मंदिर पोहेगाव, हॅाटेल अतिथी रांजणगाव याठिकाणी पडलेले आहेत. इतर अनेक ठिकाणीही अशीच अवस्था या रस्त्याची झाली आहे.

कायम ये-जा करणार्‍या वाहनधारकांना खराब रस्त्याचा मोठा त्रास होत आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुर्णता दुर्लक्ष आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामात लक्ष घालून हा रस्ता दर्जेदार व वाहतुकीयोग्य करावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. या रस्त्याला नेहमीच मलमपट्टी केली जाते पण कायमचे काम का केले जात नाही. अजुन किती दिवस मलमपट्टीवर काढायचे अशा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे.

या रस्त्याने समृध्दी महामार्गासाठीच्या खडीची अवजड वाहतूक होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी या वाहनातून खडी खाली पडते. त्यावरुन दुचाकीधारक घसरुन पडतात. रांजणगावच्या पंपाजवळ असलेल्या वळणावर ही खडी सांडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यांना सुचना करुनही संबंधित त्याकडे दुर्लक्ष करतांना दिसतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com