तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघा भावांना 10 वर्षे सक्तमजुरी

तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघा भावांना 10 वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तरुणास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघा सख्ख्या भावाला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातु यांनी दोषी धरून 10 वर्षे सक्तमजुरी व 19 हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. दया उर्फ बोंदू मच्छिंद्र नेटके व हरिश उर्फ कोंड्या मच्छिंद्र नेटके (दोघे रा. लालटाकी, भारस्कर कॉलनी, अहमदनगर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये प्रकाश तात्या खंडागळे या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रकाशचे वडील तात्या हरी खंडागळे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307, 326, 504 व 506 (2) नुसार गुन्हा दाखल केला होता.

तात्या खंडागळे यांच्या घरासमोर दया नेटके व हरिश नेटके हे दोघे सख्खे भाऊ राहतात. 26 नोव्हेंबर, 2019 रोजी रात्री दया नेटके व हरिश नेटके यांचे आपसात वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ चालू होती. सदरच्या शिव्या तात्या खंडागळे यांचा मुलगा प्रकाश व नाती यांना ऐकू येत असल्याने प्रकाश यास ते सहन न झाल्याने त्याने घराचे बाहेर येऊन नेटके बधूंना म्हणाला,‘शिवीगाळ करू नका, येथे माझ्या मुली राहतात’. त्यावर हरिश नेटके याने प्रकाशला शिवीगाळ व दमदाटी केली व अंगावर धावत जाऊन त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दया नेटके यास आवाज देवून,‘दया याला ठार मार, जीवंत सोडायचे नाही’, अशी चिथावणी दिली. दयाने स्वतः चे घरात पळत जाऊन धारदार चाकू घेऊन प्रकाश यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या उजव्या बरगडीच्या खाली मारून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला. घटनेबाबत तोफखाना पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातु यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षाच्यावतीने एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व फिर्यादी, जखमी साक्षीदार, वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील मंगेश वसंतराव दिवाणे यांनी कामकाज पाहिले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी सहा फौजदार बी. बी. बांदल यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.