
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
नेवासाफाटा येथील एका युवकाने प्रवरासंगम येथील नदीपात्रात आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत महेश छबुराव थोरात (वय 45) धंदा- नोकरी रा. तारापार्क नेवासाफाटा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझा मोठा भाऊ मोहिनीराज छबुराव थोरात हा त्याच्या दोन मुलांसह कल्पवृक्ष सोसायटीजवळ राहण्यास आहे. 15 मे रोजी भाऊ मोहिनीराज याने कळविले की, त्याचा मुलगा देवेंद्र (वय 23) हा घरामध्ये नाही तो कोठेतरी निघून गेला आहे. त्यानंतर मी त्याच्या मित्रांकडे विचारपूस करत असताना तो मोटारसायकल घेवून प्रवरासंगम येथे गेला असल्याबाबत समजले.
त्यानंतर मी घ्याचा शोध घेत प्रवरासंगम येथे गेलो असता सिद्धेश्वर पुलावर त्याचेकडील मोटारसायकल मिळून आली. परंतु पुतण्या देवेंद्र त्याठिकाणी मिळून आला नाही. त्याने पाण्यात उडी मारली असावी असा संशय आल्याने स्थानिक पोहणार्यांच्या मदतीने शोध घेत असताना 16 मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पुतण्या देवेंद्र मोहिनीराज थोरात याचे प्रेत सिद्धेश्वर पुलाच्या खाली मिळून आले. या खबरीवरुन नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.