रॉड, दांडक्याने हल्ला करून तरूणाच्या खुनाचा प्रयत्न

बोल्हेगावातील घटना || सामाईक पाण्याच्या बोअरचा वाद
रॉड, दांडक्याने हल्ला करून तरूणाच्या खुनाचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

समाईक पाण्याचा बोअरची मोटार दुरूस्तीच्या वादातून तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला. स्वप्निल तुकाराम ससाणे (वय 28 रा. वडगाव गुप्ता ता. नगर, हल्ली रा. आनंद पार्क, बोल्हेगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. शनिवारी (दिनांक 27 मे) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास बोल्हेगाव उपनगरात ही घटना घडली.

जखमी ससाणे यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून 11 ते 12 जणांविरूध्द काल (रविवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलजान निजामुद्दीन अन्सारी, निजामुद्दीन अन्सारी, रौफ बाबुलाल इनामदार, फईम जमीर शेख, वडापाव वाला व त्याचा मुलगा (नावे माहिती नाही, सर्व रा. आनंद पार्क, बोल्हेगाव) व इतर अनोळखी पाच ते सहा जणांविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.

ससाणे राहत असलेल्या कॉलनीमध्ये 20 घरांमध्ये एक सामाईक पाण्याचा बोअर आहे. शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता ससाणे त्यांच्या घराकडे जात असताना निजामउद्दीन अन्सारी हा त्यांना म्हणाला,‘बोअरची मोटार जळाली आहे. दुरूस्ती करिता पैसे दे’, त्यावर ससाणे त्यास म्हणाले,‘बोअरची मोटार नेहमीच जळते, तुमच्या घरात जास्त लोक आहेत. त्यामुळे तुम्ही तिचा जास्त वापर करता, चावी माझ्याकडे द्या मी मेन्टेनन्स पाहतो’. तेव्हा निजामउद्दीन याने ससाणे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर ससाणे घराकडे निघून जात असताना निजामउद्दीनसह इतरांनी त्यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

ससाणे यांची बहिण लता गायके या सोडवण्यास आल्या असता त्यांना सुध्दा मारहाण केली. त्यानंतर ससाणे यांना त्यांचे वडील व इतर नातेवाईक रिक्षातून रुग्णालयात घेऊन जात असताना रिक्षाची तोडफोड केली. सदरचा प्रकार सुरू असताना याची माहिती तोफखाना पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मारहाण करणार्‍या काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com