
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
स्नॅपचॅटवर फ्रेंडशिप का केली म्हणून शिर्डीतील एका तरुणावर दोन तरुणांनी चाकू हल्ला करत गंभीर जखमी केले. शिर्डीची वाढती गुन्हेगारी नागरिकांच्यादृष्टीने चिंतेची बाब होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
यासंदर्भात शिर्डी येथील सुदर्शन आप्पासाहेब मुरमुडे याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले, शिर्डीतील कालिकानगर भागात असणार्या माझ्या गल्लीतील मागच्या बाजूस राहणार्या एका मुलीस आपण ओळखतो व ती मला स्नॅपचॅटवर फ्रेंड आहे. 14 जानेवारीला त्या मुलीची आई व मामा आमच्या घरी आले. त्यावेळी त्यांनी माझ्या आईला सांगितले की तुमचा मुलगा आमच्या मुली सोबत मोबाईलवर मेसेज करतो. तरी त्याला समजावून सांगा. त्यानंतर दुपारी मुलीचे मामा माझ्या दुकानाजवळ आले. त्यांनी माझे मानलेले मामा राजू सोमवंशी यांनाही तेथे बोलावून त्यांना ही गोष्ट सांगितली. मामा सोमवंशीने मला यासंदर्भात विचारले असता आपण फक्त या मुलीशी स्नॅपचॅटवर फ्रेंड आहोत बाकी काही संबंध नाही व मी हा स्नॅपचॅट नंबर बंदही केला, असेही सांगितले. त्यानंतर ते निघून गेले.
15 जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री 7 वाजता मी दुकानावरून घरी जात असताना धनतारा चौक येथे मला त्या मुलीचा भाऊ आणि त्याचा एक अनोळखी मित्र भेटला. तिचा भाऊ मला म्हणाला की, कालचा विषय आपण बसून मिटून घेऊ, तेव्हा मी म्हणालो की, कालच मी स्नॅपचॅट डिलीट केला आहे. माझा काही संबंध नसताना मला विनाकारण खूप त्रास झाला आहे असे सांगितले. तरी पण तो म्हणाला की, मी सागर पवार याला बोलावून घेतो. आपण आज पूर्णपणे सर्वकाही मिटून घेऊ असे म्हणत तो माझ्या गाडीवर बसला आणि मला पिंपळवाडी रोडकडे गाडी घेण्यास सांगून माझ्या मागे त्याचा मित्र गाडीवर आला. आम्ही बुलढाणा अर्बन बँक, साई निवारा शिर्डी येथे मोकळ्या जागेत थांबलो.
तिचा भाऊ मला म्हणाला, सुदर्शन तू चुकीचे काम केले आहे. तू माझ्या बहिणीला प्रपोज केला आहे. मी म्हणालो की, असे मी काही केलेले नाही. तरीदेखील मी माफी मागतो. असे म्हणत असताना त्याचा मित्र माझ्याजवळ आला आणि त्यांनी माझ्या तोंडात चापड मारली. मी त्यांना का मारता असे विचारले व प्रतिकार केला. तेव्हा त्या मुलीच्या भावाने त्याच्या खिशातून चाकू काढला आणि तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत व शिवीगाळ करत माझ्या छातीवर चाकूने वार केला. त्याच्या मित्रांनी खिशातून चाकू काढून माझ्यावर चाकूने वार केला. आपण तसेच जखमी अवस्थेत पळत सुटलो. रस्त्यात एका इसमाकडून मोबाईल घेऊन मामा व नातेवाईकांना फोन लावला. ते आले त्यांनी मला हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल केले. अशी माहिती सुदर्शन मुरमुडे यांनी पोलिसांना दिली.
त्यानुसार दोघा चाकू हल्ला करणार्या आरोपीविरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 33/23 प्रमाणे भादंवि. कलम 307, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे करत आहेत.
शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेण्याकरिता दररोज लाखो भाविक येतात परिणामी येथील गर्दी लक्षात घेऊन गृह खात्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांची नियुक्ती केली आहे. याठिकाणी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र पोलीस व्यवस्था तसेच राखीव पोलीस दल अशा विशेष तुकड्या तैनात असतानाही शिर्डीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीची वाढ होत आहे. परिणामी शिर्डीतील ग्रामस्थांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी आपल्या खाकीचा धाक अधिक निर्माण करून गुन्हेगारीला लगाम घालावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.