
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय युवकाचा ‘एच3एन2’ इन्फ्लूएंझा व कोविडच्या संयुक्त संसर्गाने मृत्यू झाल्यानंतर या गंभीर घटनेची दखल राज्य पातळीवरून घेण्यात आली असून बुधवारी सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुढील सूचना व उपाययोजनांची दिशा ठरवली आहे.
दरम्यान, एन्फ्लूएंझा व कोविडचा संसर्ग होण्यापूर्वी संबंधित युवक छत्रपती संभाजीनगरहून मुंबई आणि मुंबईतून अलिबागला क्रूजमधून गेल्याची माहिती समोर आली आहे. अलिबागची हीच क्रूज पार्टी त्याला भोवली. मयत युवकाच्या संपर्कात 66 व्यक्ती होत्या. त्यांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. त्यातील सहाजण पॉझिटिव्ह होते. मात्र, त्यांना कसलाही त्रास नव्हता. उर्वरित दोघांना किरकोळ त्रास होता. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मूळचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असलेला व नगरजवळील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या एका 23 वर्षीय युवकाचा सोमवारी (13 मार्च) रात्री येथील एका खासगी रूग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झालेला आहे. या रूग्णाचे विविध नमुने तपासणीसाठी पाठविले असता मंगळवारी (14 मार्च) दुपारी खासगी प्रयोग शाळा तपासणी अहवालामध्ये कोविड 19 व ‘एच3एन2’ पॉझिटिव्ह आढळुन आलेला आहे. देशात इन्फ्लूएंझाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना महाराष्ट्रातील पहिला व देशातील तिसरा एन्फ्लूएंझाचा मृत्यू नगरमध्ये झाल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची दखल राज्य पातळीवरून घेण्यात आली असून बुधवारी सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोगरे यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेतली.
युवकाच्या मृत्यूबाबत अधिक माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोगरे यांनी सांगितले की, संबंधित युवक हा 10 मार्चपूर्वी अलीबागला पर्यटनासाठी गेला होता. त्यानंतर 11 तारखेला त्याला ताप आला. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रूग्णालयातील डॉक्टरानी त्याला अॅडमिट होण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याने नकार दिला. त्याच मध्यरात्री त्याला खूप त्रास झाला. म्हणून त्याला नगरमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर दीड दिवसांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
लक्षणे आढळल्यास उपचार घ्या- जिल्हाधिकारी
नागरिकांनी घाबरून न जाता कोविड व इन्फ्लूएंझा आजार टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास नजीकच्या दवाखान्यामध्ये जाऊन औषधोपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. कोविड व इन्फ्लूएंझा हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. मात्र याचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, पाच वर्षाखालील बालके, वृद्ध व्यक्ती आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आहे. रूग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळुन आल्यास त्यांनी नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेत औषधोपचाराकरीता जावे असे आवाहनही जिल्हाधिकार्यांनी केले आहे.
समिती घेणार शोध
‘एच3एन2’ इन्फ्लूएंझा व कोविडच्या संयुक्त संसर्गाने युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले असले तरी याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. तो युवक शिक्षण घेत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर व उपचार घेतलेल्या खासगी रूग्णालयातील डॉक्टरांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. समितीचे सदस्य युवकाचा मृत्यूबाबत अधिक माहिती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, नगर शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व आयएलआय, स्वाईन फ्ल्यु (एच 3 एन 2) व करोना बाधित रुग्णांची माहिती आरोग्य विभागास तत्काळ कळवावी, ही माहिती कळविणे बंधनकारक आहे, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिल्या आहेत. बुधवारी आयुक्त डॉ. जावळे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड व स्वाईन फ्ल्यु (एच 3 एन 2) या आजाराच्या नियंत्रणासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते. ज्या नागरीकांना ताप येणे, खोकला, घसा खवखवणे व दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणे असतील त्यांनी आपल्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात अँटीजन तपासणी करुन उपचार घ्यावेत, असे आवाहनही आयुक्त डॉ. जावळे यांनी केले आहे.