
उंबरे |वार्ताहर| Umbare
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील तरुण शेतकर्याचा शेतात काम करत असताना तीव्र उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, ब्राम्हणी येथील बाळासाहेब गोरक्षनाथ बानकर (वय 38) यांचा काल शनिवार 20 मे रोजी दुपारी दोन वाजता शेतात काम करत असताना तीव्र उष्णतेमुळे मृत्यू झाला. बाळासाहेब बानकर हे शेतामध्ये काकडी (खिरे) तोडत असताना उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात होती. भर उन्हात काम करत असताना दुपारी दोनच्या सुमारास उष्णतेमुळे त्रास होऊन ते अचानक बेशुद्ध झाले.त्यांना कुटुंबातील नातेवाईकांनी दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.
सध्या शेतकरी कुटुंबांमध्ये प्रत्येक शेतकर्याला शेतीमध्ये काम केल्याशिवाय पर्याय नाही. जनावरांचा चारा, कांद्याची काढणी, उसाची खुरपणी तसेच शेतामध्ये असणारे पीक त्याचबरोबर काकडी, मिरचीच्या तोडणीसाठी मजूर मिळत नाही म्हणून प्रत्यक्ष शेतकर्यांना स्वतःलाच शेतामध्ये राबावे लागते. उष्णतेच्या तीव्रतेमुळे शेतकर्याचा मृत्यू झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता व्यक्त होत आहे.