तरवडी येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

तरवडी येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील तरवडी येथे विजेचा धक्का (इलेक्ट्रीक शॉक) लागून 39 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

याबाबत जनार्धन विठ्ठल क्षीरसागर (वय 55) रा. तरवडी ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यात म्हटले की, 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेचे सुमारास मी कुकाणा येथून माझे कामकाम पूर्ण करून तरवडीकडे येत असताना नाईकवाडी तरवडी येथून जात होतो. त्यावेळी मला नंदकुमार देवराव नाईक यांचे घरासमोर लोकांची गर्दी दिसल्याने मी तेथे जाऊन पाहिले असता, तेथे मला नंदकुमार देवराव नाईक हा बेशुद्ध अवस्थेत खाली पडलेला दिसला.

त्यावेळी आजुबाजुच्या लोकांनी विजेचा धक्का लागल्याचे सांगितल्याने आम्ही त्यास खाजगी वाहनातून कुकाणा येथे खासगी हॉस्पिटल येथे आणले. तेथील डॉक्टरानी नेवासा फाटा येथे घेऊन जाण्यास सांगितल्याने आम्ही नंदकुमार देवराव नाईक यास कुकाणा येथून रुग्णवाहिकेने नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले.

या खबरीवरून नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टरला 118/2022 सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद केली असून पोलीस नाईक श्री. गडाख पुढील तपास करीत आहेत. दरम्यान मयत नंदकुमारचे आई-वडील हे चारधाम यात्रेला गेलेले असल्याचे कळते. त्यांना याबाबत सूचना देण्यात आली असून ते तरवडीकडे येण्यास निघाले असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com