
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
तळ्यात एका किनार्यावरून पोहत दुसर्या किनार्याला जाण्याची पैंज एका युवकाच्या जीवावर बेतली. यात पोहता येत असतानाही दम लागून तळ्यात मध्येच बुडून युवकाचा मृत्यु झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील सुपे शिवारात आज घडली.
दत्ता झुंबर उबाळे (26, रा. चिंचोली काळदात) असे यात मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील सुपे गावाच्या शिवारामध्ये खडी क्रेशर साठी खोदलेल्या खदानी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा तयार झाला यामध्ये चिंचोली काळदात येथील चौघेजण दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोहोण्यासाठी गेले होते. ते सर्वजण भरपूर पोहल्यानंतर सर्व मित्रांमध्ये या तळ्याला ह्या टोकावरून पलीकडच्या टोकापर्यंत जाईल त्याला बक्षीस देण्यात येईल अशी पैज लावण्यात आली.
ही पैज मी जिंकणार असे म्हणून दत्ता उबाळे यांनी पलीकडच्या काठावर जाण्यासाठी सुरुवात केली. परंतु बराच वेळ पाण्यात होत असल्यामुळे अर्ध्या पेक्षा पुढे गेल्यानंतर त्याला दम लागला. यामुळे तो बुडू लागल. त्याने मित्रांना आवाज दिला. मात्र सर्वांना तो आपली चेष्टा करत आहे असे वाटल्याने कोणीही त्याच्या मदतीसाठी गेले नाही. तो बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर इतरांनी पाण्यात उड्या मारल्या परंतु तोपर्यंत पाण्यात बुडून दत्ताचा मृत्यु झाला होता.
ही घटना समजताच सुपे गावातून आणि चिंचोली परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी जमले याप्रमाणे तहसीलदार नानासाहेब आगळे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस कर्मचारी व इतर कर्मचार्यांच्या आणि नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी पाण्यामध्ये उतरुन अनेक प्रकारे शोधाशोध सुरू झाली परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असल्यामुळे मृतदेह सापडत नव्हता यामुळे अहमदनगर महापालिकेचे अग्निशामक दलाचे पथक या ठिकाणी बोलाविण्यात आले त्यांनी देखील खूप शोधाशोध केली मात्र रात्री उशिरापर्यंत मृतदेह सापडला नव्हता.