तरुणाई व्हाइटनरच्या नशेच्या विळख्यात...!

पोलिसांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी
तरुणाई व्हाइटनरच्या नशेच्या विळख्यात...!

शिर्डी (प्रतिनिधी)

शहरातील अनेक अल्पवयीन मुले व्हाइटनर व झंडूबाम नशेच्या अधीन झाले असून हे तरुण शिर्डी शहरातील साईभक्तांसाठी व वाटसरु वयोवृद्ध नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. याकडे शिर्डी पोलिसांनी गंभीरपणे लक्ष घालून नशेबहाद्दर अल्पवयीन मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी परराज्यातून अनेक तरुण मजुरी करण्याकरीता शिर्डीत येऊन वास्तव्य करतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉटेल व बांधकाम व्यवसाय सुरू असल्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना सहज रोजगार उपलब्ध होतो. मजुरी केल्यानंतर दैनंदिन मिळणार्‍या पैशातून येथील बहुदा अल्पवयीन मुले नशेच्या आधीन गेले आहेत.

नशा केल्यानंतर भिक्षेकरी लोकांचे पैसे घेऊन पळून जाणे तर कधी बसस्थानकावर झोपलेल्या प्रवाशांच्या पैशाचे पाकीट, बॅगा, मोबाईल व महिलांची पर्स घेऊन पळतात. ही नशा करणारी मुले बसस्थानक, साई मंदिर परिसर, शिर्डी नगरपंचायत इमारतजवळ समूहाने झोपलेले तर कधी बसलेले असतात. शुन्यात हरवलेली भेदक नजर नशापाणी केल्यामुळे कोणी मारहाण केली तरी त्यांना फारसे लागत नसल्याने ते फक्त मारहाण करणार्‍याकडे भेदक नजरेने पाहत असतात. नशेत असल्यामुळे लोक आपल्याला का मारहाण करत आहेत? हे देखील यांंना समजत नाही.

या मुलांच्या नखामध्ये धारदार ब्लेड लावलेले असल्यामुळे त्यांना पकडण्याचे धाडस कोणी करत नाही. परिणामी साईभक्त, ग्रामस्थ व वाटसरुंना या गोष्टीमुळे मनस्ताप होत आहे. या मुलांना पकडण्यासाठी शिर्डी पोलिसांनी मोठी मोहीम राबविण्याची गरज असून अशा मुलांची रवानगी बालसुधारगृहात नगर येथे करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नशा करणार्‍यांना व्हाइटनर व झंडूबाम देणार्‍या जनरल स्टोअर व मेडिकल दुकानदारावर देखील पोलिसांनी कारवाई केली तर यावर सहजपणे नियंत्रण येऊ शकेल. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी शिर्डी नगरपंचायत व साईबाबा संस्थान सुरक्षा व्यवस्था यांना बरोबर घेऊन व्हाइटनरची नशा करणार्‍या तरुणांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

शिर्डीत अल्पवयीन अनेक तरुण व्हाइटनरच्या नशेच्या आधीन गेल्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. जनरल स्टोअर व्यावसायिकांनी व्हाइटनर खरेदी करण्याकरीता कोण येते हे तपासून पाहणे गरजेचे आहे. ही नशा करणार्‍यांवर पोलिसांनी कडक कारवाई करून त्यांना बालसुधारगृहात पाठवावे तरच या गोष्टीवर नियंत्रण येऊ शकेल.

कमलाकर कोते, शिवसेना नेते, शिर्डी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com