विजेचा धक्‍का लागून युवकाचा मृत्यू

वडील व भाऊ जखमी
विजेचा धक्‍का लागून युवकाचा मृत्यू
FIle Photo

जामखेड l तालुका प्रतिनिधी

जामखेड (Jamkhed) तालुक्यातील वंजारवाडी (Vanjarvadi) येथील योगेश बळीराम जायभाय यांचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना काल पहाटे सहा वाजता घडली. याबाबत जामखेड पोलीसात (Jamkhed Police) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेत युवकाचे वडील व भाऊ जखमी झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश बळीराम जायभाय (वय २३ रा. वंजारवाडी ता. जामखेड) हा पहाटे सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे उठून शौचालयाला चालला असता घरा जवळील विद्युत खांबावरील तार तुटून खाली पडली होती. ती त्यास दिसली नसल्याने त्याचा तारेवर पाय पडल्याने त्याला शॉक बसला असता तो ओरडला त्यावेळी त्याचे वडील बळीराम जायभाय व भाऊ गोकुळ यांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांना विद्युत शॉक बसला व ते ही खाली पडले.

यावेळी वडील बळीराम हे बेशुद्ध पडले तर भाऊ गोकुळ याचा हात भाजला. त्यावेळी शेजारील राहणारे नातेवाईक यांनी दोरीच्या साह्याने तार बाजुला करून योगेश याला बाजूला करून जामखेड येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी मयत योगेशचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला. दुपारी उशीरा वंजारवाडी येथे मयत योगेश जायभाय याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरवार रोजी वंजारवाडी व परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला होता. यामुळे तेथे ओलावा होता. योगेशेच्या अपघाती निधनाने वंजारवाडी व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com