
माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav
शेतालगतच्या शेती महामंडळच्या जमिनीत गायी चारतांना गायींना तळ्यावर पाणी पाजण्यासाठी गेलेल्या निखील अनिल लटमाळे (वय 17) या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव शिवारात घडली.
निखील हा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अशोकनगर येथे आयटीआयमध्ये प्रथम वर्षात शिकत होता. रविवारची सुट्टी असल्याने वस्ती शेजारच्या हरेगांव मळा शेती महामंडळाच्या पडीक जमिनीत गायी चारण्यासाठी घेऊन गेला होता. गायींना पाणी दाखविण्यासाठी तो तळयावर गेला असताना तोल जाऊन खोल पाण्यात बुडाला. ही घटना पाहिलेल्या दुसर्या मुलाने वस्तीवर जाऊन सांगितली. नातेवाईकासह बाजुच्या तरूणांनी तातडीने पाण्याबाहेर काढून तातडीने श्रीरामपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रूग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात माळवाडगाव येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील अनिल बाबासाहेब लटमाळे यांना एकुलता एक मुलगा होता. माळवाडगाव, मुठेवाडगाव, परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ बर्डे हे करीत आहेत.