युवक काँग्रेसची ‘रोजगार दो’ ची मागणी

युवक काँग्रेसची ‘रोजगार दो’ ची मागणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

दरवर्षी 2 कोटी नोकर्‍या देण्याचे आमिष दाखवून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातील व राज्यातील तरुणांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला आहे.

लॉकडाऊननंतर उद्भवलेल्या बेरोजगारीवर पावले उचलून केंद्र सरकारने मदत करावी. राज्यातील व देशातील तरुणांना तातडीने नोकर्‍या उपलब्ध करून द्याव्या, यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारकडे ‘रोजगार दो’ मागणी केली आहे.

संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार अमोल निकम यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष सांगळे, निखील पापडेजा, सोमेश्वर दिवटे, सचिन खेमनर, रमेश गफले, तान्हाजी शिरतार, भागवत कानवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले, दरवर्षी 2 कोटी नोकर्‍यांचे आमिष देऊन मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र, मागील 6 वर्षांमध्ये देशातील तरुणांचा पूर्ण भ्रमनिरास या सरकारने केला आहे. अनेक सहकारी संस्थांचे खासगीकरण केले असून खासगीकरणाला बळकटी दिली आहे.

जीएसटी, नोटाबंदी या आत्मघातकी निर्णय यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली आहे. त्यातच दुर्दैवाने आलेल्या करोना संकटाची गांभीर्याने न दखल घेतल्याने अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. देशात लॉकडाऊनमुळे साधारण 12 ते 15 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत.

केंद्राने अर्थव्यवस्था अधिकाधिक मजबूत करताना सहकारी व लघुउद्योगांना सक्षम करताना त्यांना आर्थिक पॅकेज द्यावे. या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना नोकर्‍या उपलब्ध होईल, यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

देशाची व राज्याचे औद्योगीकरण बळकटी व अर्थव्यवस्था मजबूत करण्यात ठोस पावले उचलावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने केली आहे.

या मागणीची अंमलबजावणी तातडीने न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशाराही युवक काँग्रेसने दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com