
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गाडी थांबवून फोन वर बोलत असलेल्या युवकाच्या गळ्यातील सोन्याची एक तोळ्याची चैन बळजबरीने काढून घेतली. रविवारी (दि. 1) रात्री आठच्या सुमारास सावेडी उपनगरातील जय बजरंग विद्यालयाच्या मैदानावर ही घटना घडली. याप्रकरणी कृष्णा तुषार बलदवा (वय 19 रा. पत्रकार चौक) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री पावणे आठच्या सुमारास कृष्णा त्याच्या दुचाकीवरून कराळे मैदान, पपींग स्टेशन रस्ता येथे जाण्यासाठी निघाला असता त्याला मित्र यश शिंदे (रा. सिव्हील हाडको) याचा फोन आला व तो म्हणाला, तु कराळे मैदानाकडे येताना मित्र अंश रत्नपारखी (रा. मोरया मंगल कार्यालयाजवळ, पाइपलाइन रस्ता) याला घेऊन ये. तेव्हा कृष्णा हा त्याच्या दुचाकीवरून मित्र अंश याला येण्यासाठी सपकाळ चौकातून जय बजरंग मैदानावरून जात असताना त्याला पुन्हा यश शिंदे याचा फोन आल्याने त्याने दुचाकी थांबवली.
तो दुचाकी वर बसून फोन वर बोलत असताना दुसर्या दुचाकी वरून आलेल्या दोघांनी कृष्णा याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन बळजबरीने काढून घेतली. तु जर कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.