
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
रस्त्याने जाणार्या विवाहित महिलेचा हात धरून चल येती का, बस माझ्या गाडीवर, असे म्हणत विनयभंग करण्याचा प्रकार शहरात वॉर्ड. नं. 7 मधील म्हाडा हाउसिंग सोसायटी परिसरात घडला. संबंधिताना याचा जाब विचारणार्या दोघांना यावेळी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील म्हाडा हाउसिंग सोसायटी परिसरात राहणारी एक विवाहीत महिला तिची मैत्रिण व पुतणीसह म्हाडा हाउसिंग सोसायटीच्या रस्त्याने फेरफटका मारत असताना जावेद शेख नावाचा तरुण तेथे आला. त्याने महिलेचा हात धरून तिला म्हणाला की, चल येती का? बस माझ्या गाडीवर, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या महिलेने व तिच्यासोबतच्या महिलेने प्रतिकार केला असता त्याने महिलेस शिवीगाळ करून धमकी दिली.
यावेळी पीडित महिलेच्या ओळखीचा एक तरुण व त्याचा मित्र तेथे आले असता त्यांनी याचा जाब विचारत तसेच समजावून सांगत असताना इतर काही जणांनी त्या तरुणाला शिवीगाळ करत लाकडी दांड्याने डोक्यात मारून डोके फोडले तसेच धमकी दिली. अशी फिर्याद पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलिसात दिली.
या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात जावेद शेख, अल्तमश शेख, महंमदअली पठाण, अंकीत मनीयार व इतर 3 जण (रा. माहीत नाही) यांच्याविरूद्ध भादंवि कलम 354 अ, 324, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्री. पाटील हे अधिक तपास करीत आहेत.