युवकावर तलवार व कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला

सोनईजवळील हनुमानवाडीची घटना; चौघांवर गुन्हा दाखल
युवकावर तलवार व कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई जवळील हनुमानवाडी येथील शनिचौकात एका युवकावर जुन्या वादाच्या कारणावरून लाकडी दांडा, तलवार, चाकू व कुर्‍हाडीने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. या मारहाण प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पैकी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

जुन्या वादाचा बदला म्हणून सागर रामचंद्र कुसळकर (रा.हनुमानवाडी शिवार) या युवकावर तलवार, चाकू, कुर्‍हाड व लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत कुसळकर यांच्या हातावर व पायावर खोलवर जखमा झाल्या आहेत.

कुसळकर यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर 136/21 भारतीय दंड विधान कलम 307, 326, 324, 4/25 नुसार अमोल राजेंद्र शेजवळ, राहुल चांगदेव शिंदे, अमोल अशोक गडाख (सर्व रा. सोनई), अक्षय रामदास चेमटे (रा. घोडेगाव) या चौघावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुल शिंदे यास अटक करण्यात आली असून अन्य आरोपी इतर गुन्ह्यात असल्याने अटक झालेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

सोनई पोलिसांनी प्राणघातक हल्ला घडल्यानंतर उशिरा गुन्हा दाखल केला. या घटनेत अधिक आरोपी असताना रात्रीतून काही आरोपी कमी झाल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे. एकाच गुन्ह्याबाबत सोनई व शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यातून अर्थपूर्ण चाचपडले जात असल्याचे उघड बोलले जात आहे. सध्या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे उघड सुरु असताना कारवाई मात्र होत नसल्याचे चित्र आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com