लग्नास नकार दिल्याने तरूणीची सोशल मिडीयावर बदनामी

भिंगारमधील घटना, तरूणास अटक
लग्नास नकार दिल्याने तरूणीची सोशल मिडीयावर बदनामी

अहमदनगर (प्रतिनिधी) - लग्न करण्यास नकार दिल्याने तरूणीचे अश्‍लील फोटो सोशल मिडियावर टाकून तरूणीसह तिच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना भिंगारमध्ये घडली. संबंधीत तरूणीच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रोहीत जालिंदर पाटोळे (रा. फर्याबाग ता. नगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पाटोळे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून भिंगार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, रोहीत पाटोळे व भिंगारमधील एका तरूणीचे प्रेमसंबंध होते. संबंधात असताना फिरायला गेल्यानंतर पाटोळे याने त्या तरूणीचे काही फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. प्रेमसंबंध असल्याने पाटोळे याने संबंधीत तरूणीकडे लग्नाची मागणी घातली. लग्न करण्यास तरूणीने नकार दिला. याचा राग आल्याने पाटोळे याने संबंधीत तरूणीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवर पाटोळे याने संबंधीत तरूणीचे फोटो प्रसारीत केले. यानंतर त्या तरूणीने भिंगार पोलीस ठाण्यात पाटोळे विरोधात फिर्याद दाखल केली.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी करून आरोपी पाटोळे याचा शोध घेतला. तो पुणे जिल्ह्यातील येरवडा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी फकीर शेख, संदीप घोडके, रवी सोनटक्के, सागर सुलाणे, रोहीत येमूल, मयूर गायकवाड, मच्छिंद्र बर्डे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने पाटोळे याला अटक केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com