युवक अपहरण गुन्ह्यातील तिघा आरोपींना शोधण्यात सोनई पोलिसांना अपयश

अवैध भिश्या व विनापरवाना सावकारीवर लक्ष देण्याची मागणी
युवक अपहरण गुन्ह्यातील तिघा आरोपींना शोधण्यात सोनई पोलिसांना अपयश

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील अमळनेर येथून दहा लाखाच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण केल्याची घटना घडली असून याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी युवकास सोडून दिले मात्र सहा दिवसांनंतरही यातील तीन पसार आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याबाबत माहिती अशी की, अंमळनेर येथील राजेंद्र द्वारकानाथ पवार यांच्याकडे भिशीचे तीस हजार रुपये थकले होते.

या रकमेचे व्याज व दंड व्याज मिळत नसल्याने पवार यांचा मुलगा सौरभ राजेंद्र पवार (वय 21) यास बुधवार ता.8 सप्टेंबर 2021 रोजी दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी सायंकाळी चार वाजता करजगाव-अंमळनेर रोडवर लक्ष्मी कॉर्नरजवळून पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट कार मध्ये बळजबरीने उचलून घेऊन अपहरण करण्यात आले होते. मुलगा रात्र उलटूनही घरी न आल्याने दुसर्‍या दिवशी राजेंद्र पवार यांनी दहा लाखांच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करण्यात आल्याची फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात दिल्यानंतर राजेंद्र भीमराज सुपनर, विलास बबन आयनर, कैलास बबन आयनर या तिघांवर भारतीय दंड विधान कलम 363, 364 (अ), 365, 384, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्याद दाखल झाल्याची बातमी आरोपींना कळताच त्यांनी युवकाला कोल्हार येथे सोडून आरोपी फरार झाले आहेत. सहा दिवस उलटूनही आरोपी अटक झाले नसून याबाबत विशेष पथक आरोपीचा शोध घेत आहेत असे पोलिसांनी सांगितले. अवैध पध्दतीने सुरू असलेल्या भिश्या व विनापरवाना सुरू असलेली सावकारी याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष द्यावे,अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com