तरुणांनी देशी गाईच्या दूध व्यवसायाकडे वळावे - शिंदे

तरुणांनी देशी गाईच्या दूध व्यवसायाकडे वळावे - शिंदे

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

आता येथून पुढे देशी गायींचे पालन करून त्यांच्या दुधाचा व्यवसाय तरुणांनी हाती घ्यावा. कारण येथून पुढे देशी गायीच्या दुधाला अच्छे दिन येणार आहेत. आता पासूनच या गायींच्या दुधाला ग्राहकांची मागणी वाढली आहे. चांगल्या प्रकारच्या गायींसाठी मी मार्गदर्शन करणार आहे. पंजाब, हरियाणा, गुजरात आदी राज्यांत उच्चश्रेणीच्या व भरपूर दूध देणार्‍या गायी मिळतात. त्यासाठी आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तरुणांनी आता या व्यवसायात आले पाहिजे. देशी गाईच्या दुधालाही अच्छे दिन येणार असल्याने दूध व्यवसाय तरूणांना आर्थिक तारणहार ठरणार असून तरुणांनी या व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील दैवत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष केशव तथा दादासाहेब शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

युवादिनाच्या पूर्वसंध्येला तरूणांना प्रबोधन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, मी स्वतः उच्चशिक्षित असूनही नोकरीच्या मागे न लागता केवळ जिद्द व स्वकर्तृतावर असलेल्या विश्वासातून समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची जाण ठेवून अल्पशा व्यवसायावर तरूण पिढीला आदर्श होईल, असे उद्योग केंद्र उभारून तरूणांना व्यवसायाची संधी देऊन अनेक कुटुंबांना आधार दिला आहे.

शिंदे म्हणाले, शेतीव्यवसायाबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय शेतकर्‍यांबरोबरच गावच्या आर्थिक विकासाचा कणा असल्याचे लक्षात घेऊन याच दूध व्यवसायातून आपल्यासह आपल्या भागातील सुशिक्षित तरुणांचा विकास होऊ शकतो, हा आशावाद डोळ्यासमोर ठेवून टाकळीमियात एका छोट्या जागेत पहिले दूध संकलन केंद्र सुरू केले. दूध व्यावसायिकांचा विश्वास संपादन करून अल्पावधीत राहुरी तालुक्यात प्रतिवर्षी दोन चिलिंग प्लांट सुरू केले. तसेच अनेक तरूणांना दूध व्यवसायाकडे वळवून त्यांना दूध संकलन केंद्र सुरू करण्यास प्रोत्साहित केले.

नवनवीन प्रकल्प उभारून दैवत उद्योग समूहामार्फत बेरोजगार तरुणांना व्यवसाय म्हणून विविध प्रकारच्या दूध प्रॉडक्टसचे स्टॉल उभारून देण्याचा मानस असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com