वडाळा बहिरोबा (वार्ताहर)-

अपघातात भाऊ मयत झाल्याने विधवा भावजयीशी विवाह करण्याचे ठरविलेल्या वडाळा बहिरोबा येथील दिराचा विवाहसोहळा अखेर थाटामाटात पार पडला.

वर्हाडी मंडळींनीही मोठ्या दिल्याने या अनोख्या विवाह सोहळ्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आणि नवदांपत्यास आशीर्वाद दिले. विधवा सुनेच्या आयुष्यात दाटलेल्या अंधाराला पुनर्विवाहाच्या निमित्ताने सास-यांनी प्रकाशाची वाट निर्माण करून दिली.

सर्वसाधारपणे जे लोक किंवा कुटुंब रूढी-परंपरेच्या बाहेर जाऊन निर्णय घेतात त्यांना वाळीत टाकलं जातं. किंवा नाकं तरी मुरडली जातात. परंतु या दीर-भावजयीच्या लग्नगाठीचे समाजाने मोठ्या दिलाने स्वागत केलं. या विवाह सोहळ्यात उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते चांगदेव मोटे यांच्या कामाला लोकांनी दाद दिली.

संजय मोटे यांचा अभियंता असलेला थोरला मुलगा महेशचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले. त्याच्यामागे पत्नी प्रांजली सात महिन्यांच्या बाळासह पोरकी झाली. प्राजंलीचे वडील बाळासाहेब गव्हाणे (राहुरी फॅक्टरी) निःशब्द झाले होते. आता मुलीचं कसं होणार या चिंतेत ते होते. सासरे संजय मोटे यांनीच यातून मार्ग काढण्याचे ठरवले. त्यांनी विधवा सुनेचा विवाह लहान मुलगा अभियंता महेंद्रबरोबर निश्चित केला. प्रांजली आणि महेंद्र यांचे मत घेतलं. ते राजी झाल्यानंतर त्यांनी पुढील हालचाली केल्या. आज हा अगळावेगळा विवाह झाला.