झेडपी सीईंओंच्या कार्यालयाबाहेर अभ्यागताच्या मृत्युने खळबळ

झेडपी सीईंओंच्या कार्यालयाबाहेर अभ्यागताच्या मृत्युने खळबळ

अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कार्यालयाबाहेर बुधवारी सायंकाही पाचच्या सुमारास अभ्यागत कक्षात बसलेल्या

एका तरूणाचा बेशुद्ध होऊन अचानक मृत्यू झाला. संबंधीताला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता मृत्यू घोषित करण्यात आले.

मूळाचा नाशिकच्या भुगूर येथील आणि 2017-18 मध्ये नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असताना नाशिकला बदली करून गेलेला निलेश चौधरी (वय 30) असे या मृत तरूणाचे नाव आहे. 2018 मध्ये चौधरी त्याने आरोग्य विभागांतर्गत परीक्षा दिली व त्याची नियुक्ती नाशिक जिल्हा हिवताप कार्यालयात झाली. परंतु नगर येथे कार्यरत असताना कार्यालयांतर्गत त्याचे काही प्रलंबित प्रश्न होते. त्यासंदर्भात त्याने 15 दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची भेटही घेतली होती, अशी माहिती मिळाली.

दरम्यान, बुधवारी (दि.30) सायंकाळी हा तरूण सीईओंच्या अभ्यागत कक्षाबाहेर बसला होता. पाचच्या सुमारास त्याला बसल्याजागीच उलट्या झाल्या व तो खाली कोसळला. सीईओंच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांनी तातडीने धाव घेत त्याला उचलले व रूग्णवाहिका बोलावून जिल्हा रूग्णालयात हलवले. परंतु दवाखान्यात नेईपर्यंतच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून शवविच्छेदनानंतरच कारण स्पष्ट होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी दिली. दरम्यान, जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी कक्षाबाहेर एकाचा अचानक मृत्यू झाल्याने झेडपी कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली.

...............

संबंधित तरूण हा काल सायंकाळाच्या सुमारास अभ्यागत कक्षात बसला होता. परंतु त्याने आपल्याला भेटण्यासाठी चिठ्ठी किंवा काही निवेदन दिलेले नव्हते किंवा आमच्या कोणा कर्मचार्‍यांकडे भेटण्याची इच्छाही बोलून दाखवली नव्हती. तो अचानक उलट्या होऊन कोसळला. त्यामुळे त्वरित रूग्णवाहिकेतून त्याला जिल्हा रूग्णालयात पाठवले. परंतु नंतर तो मृत्यू झाल्याचे समजले.

- राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी.

....................

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com