
अहमदनगर |प्रतिनिधी)| Ahmedngar
येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे शिक्षा भोगत असलेल्या तीन आरोपींना अभिवचन रजेवर सोडल्यानंतर ते पुन्हा कारागृहात हजर न झाल्याने त्यांच्याविरूध्द येथील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे दत्तात्रय लक्ष्मण किरवे (वय 39 रा. पोलीस क्वार्टर्स, पुणे-06) यांनी फिर्याद दिली आहे.
विकास गणेश नायडू (रा. कोंबडीवाला मळा, सोलापूर रस्ता, अहमदनगर), सुरज विठ्ठल वाल्मिकी (रा. इंदिरानगर, भिंगार), साहेबराव मोहन बेरड (रा. दरेवाडी ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. एका गुन्ह्यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेले आरोपी नायडू, वाल्मिकी व बेरड यांना 12 मे, 2022 रोजी कोविड-19 आपतकालीन आकस्मित अभिवचन रजेवर सोडले होते. सदर आरोपींना वेळोवेळी 23 वेळा रजा वाढवून दिली होती.
दरम्यान त्यांची अभिवचन रजा 1 जून, 2022 रोजी संपत असल्याने ते हजर होणे आवश्यक होते. परंतु ते 11 जून, 2022 पर्यंत हजर न झाल्याने शेवटी दत्तात्रय किरवे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून आरोपी नायडू, वाल्मिक व बेरड यांच्याविरूध्द फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींविरूध्द भादंवि कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस नाईक आर. टी. गोरे करीत आहेत.