करोनाच्या सावटात आजपासून श्रीरामनवमीची यात्रा

श्रीराम जन्मोत्सवाचे फेसबुकवर ऑनलाईन प्रक्षेपण
करोनाच्या सावटात आजपासून श्रीरामनवमीची यात्रा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - हिदू-मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील सय्यद बाबा दर्गाह ऊरूस व श्रीरामनवमी यात्रा उत्सवावर यंदा करोनाचे सावट पसरले आहे.

लॉकडाऊनमुळे यंदा उरूस साध्या पद्धतीने साजरा झाला तर आजपासून सुरू होत असलेला श्रीरामनवमी उत्सवही साध्या पद्धतीने संपन्न होत आहे. असे असले तरी श्रीराम मंदिरातील पुजा-अर्चा, आरती ऑनलाईन भाविकांना पाहता येणार आहे.

दरवर्षी सय्यदबाबा उरूस व श्रीरामनवमी यात्रेसाठी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा करोनाच्या पार्श्‍वभुमीवर शासनाने मर्यादा घालून दिल्याने दोन्ही उत्सव साध्या पद्धतीने होणार आहेत. तीन दिवस सुरू असलेला सय्यद बाबा ऊरूस साध्या स्वरूपात साजरा झाला. दर्गाहातील पुजारी रहेमानअली शाह कादरी बाबा यांच्या हस्ते पुजा व इतर धार्मिक विधी झाले. यानिमित्त राम रहिम उत्सव समितीच्यावतीने आयोजित प्रसिद्ध कव्वालांच्या कव्वालींचा सामना यंदा रंगला नाही. दर्गाहात भाविकांचीही फारसी गर्दी झाली नाही.

आजपासून तीन दिवस सुरू होणारा श्रीरामनवमी ऊत्सवही साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा ध्वज मिरवणूक, श्रीराम, लक्ष्मण व जानकी तसेच शनिदेवाची मिरवणुकही होणार नाही. मंदिरातील सकाळची पुजा-अर्चा, आरती यासह इतर धार्मिक विधी पुजार्‍याच्या हस्ते होइल. यावेळी कोणीही मंदिरात गर्दी करू नये, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन श्रीराम मंदिर यात्रा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

यात्रा काळात दरवर्षीप्रमाणे यंदा मोठमोठे रहाट पाळणे, गृहोपयोगी वस्तू, खेळण्याची दुकाने तसेच मनोरंजनाची साधने आलेली नाहीत. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असून रस्त्यावर शुकशुकाट आहे. गेल्या वर्षी करोनामुळे यात्रा, उत्सव बंद होते. यंदा करोनाची दुसरी लाट आली आहे. करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आल्याने याहीवर्षी भाविक दर्शनास तसेच यात्रेला मुकले आहेत.

यात्रा काळात भाविकांना मंदिरात येता येत नसले तरी आरती, पुजा व श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे. भाविकांना सकाळी 11:30 ते 12:15 यावेळेत श्रीराम जन्मोत्सव मे.पोपट भगिरथ महाले (PBM Jewellers) या फेसबुक पेजवर Live पाहता येणार आहे. सर्वांनी आरती व श्रीराम जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com