‘यंत्र’ बंदीवर शिंगणापुरात व्यावसायिकांनी शोधला नवा फंडा!

नव्या प्रकारची यंत्रे भाविकांच्या माथी मारण्याचा प्रयत्नही देवस्थानने हाणून पाडला
‘यंत्र’ बंदीवर शिंगणापुरात व्यावसायिकांनी शोधला नवा फंडा!

सोनई |वार्ताहर| Sonai

शनीशिंगणापुरात पूजा साहित्यांच्या माध्यमातून भाविकांची होणारी फसवणूक आणि त्यासदंर्भात वारंवार होत असलेल्या तक्रारीची दखल घेऊन अखेर देवस्थान ट्रस्टने भक्तांच्या लुटमारीस कारणीभूत ठरत असलेल्या पूजा साहित्यातील चार वस्तूंवर बंदी घातली आहे. यावर पर्याय म्हणून नवीन यंत्रे विकण्यासाठी दुकानदारांनी नवीन फंडा आणला असला तरी या नवीन यंत्रानाही मंदिरात नेण्यास सुरक्षा रक्षकांनी परवानगी दिली नाही.

शनीअमावस्या यात्रेसाठी आलेल्या एका भक्ताने दर्शनपथ, मंदीर परीसरात पुजेच्या ताटातील यंत्र पायदळी पडल्याचे बघीतले. यानंतर त्यांनी या विटंबनेचा व्हिडीओ काढून मंत्रालयातील काही व्यक्तींना पाठविला होता. या व्हिडीओची दखल घेऊन देवस्थान विश्वस्त मंडळाने दोन दिवसांपूर्वी शनीयंत्र, नवग्रह यंत्र, पादुका व चांदी सारखा दिसणारा शिक्का या चार वस्तू मंदिरात घेऊन जाण्यास बंदी घालून धाडसी निर्णय घेतला.

शनैश्वर देवस्थान ट्रस्टने सर्व पुजा-साहित्य विक्रेत्यांना यंत्र बंदीबाबत सूचना दिली असून पुजेच्या ताटात या वस्तू दिसल्यास कारवाई करण्यात येईल असे सुचित केले आहे. सुरक्षा विभागाचे पथक महाद्वारमध्ये ठेवण्यात आले असून या धाडसी निर्णयानंतर पुजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. बंदी घातलेल्या वस्तूसह पुजेचे ताट पाचशे ते दोन हजारांस विकले जात होते. देवस्थानच्या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे. तसंच यंत्र बंदीचा निर्णय कायमस्वरुपी अंमलात रहावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यंत्र विकून लुटण्याचा प्रयत्न सुरुच

मंदीरात ठराविक यंत्रबंदी झाल्यानंतर व्यवसायिकांनी तातडीने तोडगा काढून श्री वास्तू यंत्र, कनकधारा यंत्र, सिद्ध श्री शनि कवच, सिद्ध पाकीट यंत्र, श्री गायत्री यंत्र, श्री गणेश यंत्र, श्री महामृत्युंजय यंत्र, वास्तू दोष नाशक यंत्र, श्री सरस्वती यंत्र, इच्छापूर्ती कछुवा यंत्र या प्रकारची जास्त वापरात येत नसलेली यंत्र विकून भाविकांची लूट चालूच ठेवलेली आहे. महाद्वारातच सुरक्षारक्षकांनी हेही यंत्र दुकानदारास पुन्हा मागे देण्यास भाविकांना सांगितले.

नालविक्री व काळ्या तिळाच्या तेलाबाबत फसवणूक

शनैश्वर देवस्थानने यंत्रांवर बंदी आणली असली, तरी नालविक्री व काळ्या तिळाच्या तेलाबाबत मोठी फसवणूक होत आहे. नाल सिद्ध केलेले आहे, असे सांगून पाचशे ते एक हजार रुपये घेतले जातात. गावात प्रवेश घेताच असलेल्या एका मोठ्या पार्किंगमध्ये भक्तांना या वस्तू घ्याव्याच लागतील अशी दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी भाविकांनी सुरक्षा विभागाकडे केल्या असल्याचे समजते. अशा वस्तूंवर बंदी घालावी अशी मागणी भाविकांतून होत आहे.

Related Stories

No stories found.