पाथर्डी तालुक्यात आजपासून कुस्त्यांचा थरार

चारशेहून अधिक मल्लांची हजेरी
पाथर्डी तालुक्यात आजपासून कुस्त्यांचा थरार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाथर्डी तालुक्यातील एस.एम. निर्हाळी उच्च माध्यमिक विद्यालयात आजपासून कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. उत्तर महाराष्ट्र केसरी चषक स्पर्धेसाठी दाखल झालेल्या कुस्ती मल्लांच्या आगमनाने मैदान फुलले आहे. जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील चारशेपेक्षा जास्त मल्ल शनिवारी सकाळी दाखल झाले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा तालीम संघ, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे व श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत असून, संध्याकाळी मल्ल एकमेकांना स्पर्धेत भिडणार आहेत. स्पर्धेचे आयोजक केदारेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापकाका ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची जंगी तयारी करण्यात आली आहे.

दोन मॅट व एक लाल मातीच्या आखाड्यात दिग्गज मल्लांच्या कुस्त्यांचा थरार प्रेक्षकांना अनुभवयास मिळणार आहे. आखाडा पूजन नाशिक जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष गोरखनाना बळकावडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर उत्तर महाराष्ट्र केसरीच्या विजयी मल्लास देण्यात येणार्या चांदीच्या गदेचेही पूजन यावेळी पार पडले. यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, पाथर्डी तालुका तालीम संघाचे सचिव पै राजेंद्र शिरसाठ, महादेव आव्हाड, पंच गणेश जाधव, शिवाजी बडे, बाळासाहेब ढाकणे, बाळासाहेब फलके, नंदकुमार दसपुते, अजय शिरसाठ, पिराजी पवार आदी उपस्थित होते.

स्पर्धेच्या ठिकाणी सकाळ पासून मल्लांचे आगमन सुरु होते. आलेल्या मल्लांचे वजन घेण्यात आले. ही स्पर्धा 48, 58, 65, 74, 84 व खुला उत्तर महाराष्ट्र केसरी गट (84 ते 120 किलो वजन) या सहा वजन गटात होत आहे. दिवस-रात्र रंगणार्या कुस्त्यांसाठी संपुर्ण नियोजन करण्यात आले असून, संध्याकाळी या कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com