
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरीच्या खंडेराया यात्रेचे खास आकर्षण असलेल्या जंगी कुस्त्यांचा हगामा मोठ्या उत्साहात पार पडला. खंडेराया देवस्थानतर्फे देण्यात येणार्या मानाच्या कुस्तीच्या एक लाख 51 हजार रुपये व गदेचा मानकरी कोल्हापूरचा पैलवान माऊली जमदाडे ठरला. त्याने दिल्लीच्या विनोदकुमारला चितपट करीत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
हगाम्यातील प्रेक्षणीय कुस्त्यांचा मनमुराद आनंद रात्री दहा वाजेपर्यंत प्रखर दिव्यांच्या प्रकाशझोतात प्रेक्षकांनी लुटला. महाराष्ट्र केसरी पदाचा मान मिळविलेला पै. पृथ्वीराज पाटील यांची राहुरीच्या शनि मंदिरापासून ग्रामस्थांतर्फे भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. अमृतेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे सुधीर तनपुरे व त्यांच्या सहकार्यांनी पैलवान पाटील यांचा सन्मान केला.
जंगी हगाम्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धा विजेते सारंगधर पैलवान, आनंदराव घोडके, दिलीपराव टोणपे यांच्यासह माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हा बँकेचे संचालक अरुण तनपुरे, सुरसिंगराव पवार, श्यामराव निमसे, नंदकुमार डोळस, दत्तात्रय ढुस, अॅड. तानाजी धसाळ, काटेवाडीचे सरपंच काटे, जगताप, अहमदनगर पालिकेचे नगरसेवक सुभाष लोंढे, शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना आमदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार कर्डिले यांच्याकडून एक लाख, ना. प्राजक्त तनपुरे 51 हजार, राहुरी यात्रा कमिटी 1 लाख याप्रमाणे साडेतीन लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
याशिवाय राम वने व धर्मा शिंदे यांच्यातील कुस्ती धर्मा शिंदेने चितपट मारली. पै. महेश लोंढे याने दिल्लीचा शेखर रजपूत यास चितपट केले. राहुरीच्या पप्पू बर्डेने लोणकरला मात दिली. सुरेश पालवे व हनुमंत शिंदे ही लढत लक्षवेधी ठरली. हगामा यशस्वीतेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे व त्यांचे सर्व सहकारी, यात्रा कमिटीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी, नितीन तनपुरे, राजेंद्र उंडे, दिलीप राका, नयन शिंगी, सदाशिव शेळके, संभाजीराजे तनपुरे आदींसह मान्यवरांनी परिश्रम घेतले.