जागतिक परिचारीका दिन : कोविड संकटकाळातील परिचारिकांच्या कार्याला सलाम

जागतिक परिचारीका दिन : कोविड संकटकाळातील परिचारिकांच्या कार्याला सलाम

वैद्यकीय क्षेत्र परिचारीका यांच्या शिवाय अपूर्णच !

अहमदनगर | प्रतिनिधी

14 महिन्यांपासून करोना संकट आहे. करोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक धोकादायक आहे. रुग्णालयांवरील भार वाढला आहे. त्याच डॉक्टरांसोबतच परिचारिका आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. सेवा बजावताना अनेकांना करोनाची लागण झाली आहे. या स्थितीतही कोविड रुग्णालयातील डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून परिचारिका निरंतर कर्तव्य बजावत आहेत.

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी परिचारीका कार्यरत आहेत. यात जिल्हा रुग्णालयात 225, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील 453 नियमित तर 175 कंत्राटी परिचारिका कार्यरत आहे. डॉक्टर कोणत्याही रुग्णांवर ठराविक वेळेत येवून उपचार करून जातात. पण त्या रुग्णांला औषधे, इंजेक्शन, सलाईन आणि भौतिक उपचार घेवून रात्रंदिन त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी डोळ्यात तेल घालून काम परिचारीकांच्यावर असते.

सध्या करोनाचे मोठे संकट आहे. जिल्हा रुग्णालयाचे रुपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आलेले असून त्या ठिकाणी सध्या अत्यावस्थ अशा 500 हून रुग्णांवर उपचार सुरू असून त्या ठिकाणी कार्यरत असणार्‍या परिचारीकांची संख्या मर्यादित असतांना रात्रंदिन या परिचारीका डॉक्टरांच्या बरोबरीने किंबहून त्यांच्या पेक्षा काळ आणि वेळ रुग्णांना सेवा देत आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचे भव्य आव्हान या परिचारिका त्यांच्या खांद्यावर घेवून समर्थपणे पेलतांना दिसत आहेत.

वास्तवात एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवणे जितके गरजेचे आहे. तितकीच त्याची काळजी घेणेसुद्धा गरजेचे असते. रुग्णालयात डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवतात. परंतु, या शस्त्रक्रियेनंतर किंवा उपचारांनंतर त्या रुग्णाची सेवा-सुश्रुषा करण्याचं काम परिचारिका करत असतात. उपचारांसोबतच रुग्णाला मानसिक आधार, त्याचं पथ्यपाणी सांभाळणेदेखील तितकंच गरजेचं असतं आणि हेच काम परिचारिका बखुबीने पार पाडत असतात. अगदी ऑपरेशन थिएटरपासून ते जनरल वॉर्डमध्ये रुग्णाला शिफ्ट करेपर्यंत नर्स कायम त्यांच्या सोबत असतात. त्यांची काळजी घेत असतात. म्हणूनच खरं तर या परिचारिकांना मानाचा मजुराच करावा लागेल. त्यातच आज जागतिक परिचारिका दिन आहे. म्हणजे, थोडक्यात सांगायचं झालं तर परिचारिकांचा गौरव, त्यांचं कौतुक करण्याचा दिवस. परंतु, हा दिवस नेमका कधी सुरु झाला त्यामागची नेमकी कथा काय ते अनेकांना ठावूक नाही. म्हणूनच ती आज जाणून घेऊयात.

आताच्या घडीलाही करोनासारख्या महाभयंकर संकटकाळात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. कुटुंबांची, मुलांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून परिचारिका आपली सेवा अत्यंत चोखपणे बजावत आहेत. अनेक रुग्णालयातील परिचारिकांनी तर गेले कित्येक दिवस आपल्या घरीदेखील गेल्या नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही.

1971 मध्ये जागतिक परिचारिका दिनाची घोषणा

जागतिक स्तरावर आपण अनेक वेगवेगळे दिन साजरे करत असतो. त्याच पद्धतीने नि:स्वार्थपणे रुग्णांची सेवा करणार्‍या परिचारिकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी (आज) 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. आजच्या दिवशी जगभरात विविध पद्धतीने हा दिवस सेलिब्रेट केला जातो. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म 12 मे रोजी झाला होता. त्यामुळे याच दिवशी म्हणजे 1971 मध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेमध्ये तो दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. फ्लोरेन्स नायटिंगल यांनी क्रिमिअन युद्धच्या वेळी रात्री जागून सैनिकांची सेवा केली होती. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी हातात कंदिल घेऊन त्या सातत्याने जखमी रुग्णांची सुश्रुषा करत होत्या. त्यामुळे त्यांना लॅम्प लेडी असंही म्हटलं जातं.

आज करोना महामारीच्या काळात परिचारीका मनापासून रात्रंदिन काम करत आहेत. यामुळे सरकारने या परिचारीकाच्या कामाची दखल घेवून त्यांना किमान एखादी वेतन वाढ देवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी. वास्तवात शासनाने वेतन वाढ दिली नाही, तरी आज आणि उद्याही या परिचारीका काम करत राहणार आहेत. विद्यमान स्थिती नगरसह राज्यातील परिचारीका चांगले काम करत आहेत.

सुरेखा आंधळे, राज्य अध्यक्षा, परिचारीका संघटना

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com