शिर्डीत जागतिक दर्जाचे कॅन्सर हॉस्पिटल

शिर्डीत जागतिक दर्जाचे कॅन्सर हॉस्पिटल

शिर्डी (प्रतिनिधी)-

शिर्डी शहरात साईबाबा संस्थांच्या माध्यमातून प्रलंबित असलेल्या विविध प्रकल्पांबरोबर चांगल्या दर्जाचे कॅन्सर हॉस्पिटल व गोशाळा उभी करण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बंगाटे यांनी दिली.

यावेळी श्री. बगाटे म्हणाले की, साईबाबा संस्थान वर्षाकाठी 28 कोटी रुपये तूप तर पाच कोटी रुपयांचे दूध, चहा, कॉफीसाठी व लाडू तयार करण्यासाठी तर उदीसाठी 15 लाख रुपयाच्या गोवरी खरेदी करण्यासाठी खर्च येतो. त्यामुळे लगतच्या काळात एक गाय एक भक्त या धर्तीवर पाच हजार गायींची गोशाळा उभी करण्यात येणार आहे. हा जवळपास 25 कोटी रुपयांचा प्रकल्प असणार आहे. त्यातून दूध आणि तूप साईबाबा संस्थानला उपलब्ध होईल याबरोबर याठिकाणी जातिवंत गाईची खरेदी करण्यात येणार आहे ही संकल्पना लोकसहभागातून राबवण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.

त्याबरोबरच शिर्डी गावकर्‍यांना चांगल्या पद्धतीने साईंचे दर्शन सुलभ झाले पाहिजे यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी विचार सुरू असून शिर्डीच्या बाजारपेठेतील अर्थकारण वाढले पाहिजे. यासाठी संस्थानचा प्रयत्न असून त्यासाठी सकारात्मक पद्धतीने साईबाबा संस्थान प्रयत्न करीत आहे. साईबाबा संस्थान लगत असलेले विविध तीर्थक्षेत्र एकमेकांना जोडून शिर्डीत आलेल्या साईभक्तांना त्या तीर्थक्षेत्रांचे सुद्धा दर्शन झाले पाहिजे. यासाठी माफक दरात वाहतूक व्यवस्था कशी उभी करता येईल यासाठीसुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी अशी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणच्या बाजारपेठेला मोठा फायदा होणार आहे.

साईबाबा संस्थानचे प्रलंबित प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच पत्रकारांच्या सकारात्मक सूचनाही साईबाबा संस्थान विचारात घेईल, असे सांगून सगळ्यांना बरोबर घेऊन एक विचारातून चांगले प्रकल्प राबवण्यासाठी आपला प्राधान्यक्रम राहील असे त्यांनी सांगितले

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com