लालपरी थांबली अन् दैनंदिन घडी विस्कटली

लालपरी थांबली अन् दैनंदिन घडी विस्कटली

कोल्हार | संजय कोळसे| Kolhar

गेल्या कित्येक दिवसांपासून लालपरी अर्थात एसटी बसची चाके थबकली. विलीनीकरणाच्या मागणीकरिता एसटी कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसले. लवकरच संप मिटेल आणि स्थिती पूर्ववत होईल हा सर्वांचा कयास अखेर भ्रमनिरास ठरला. संप लांबल्याने आता प्रवाशांचे हाल वृद्धिंगत होत चालले. विद्यार्थी, नोकरदार वर्ग, शेती, व्यापार, व्यवसाय नव्हे सर्वच घटकांची कमी-अधिक प्रमाणात मोठी कुचंबना होत आहे. दैनंदिन दळणवळणाची घडी विस्कटल्याचे परिणाम गडदपणे दृष्टीपथास येऊ लागले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या रस्त्यावर धावताना सर्वत्र नजरेस पडणार्‍या एसटी बसेस (लालपरी) बर्‍याच दिवसांपासून दिसेनाशा झाल्या. मागण्यांकरिता कर्मचार्‍यांचा संप ही एक बाब झाली. त्यावर सरकारचा निर्णय ही दुसरी बाजू झाली. मात्र ज्यांच्याकरिता बस धावते त्या सर्वसामान्यांची तिसरी बाजू याचे परिणाम भोगत आहे. यामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत. ज्यांच्याकडे स्वतःची खासगी वाहने आहेत. त्यांना कदाचित याची फारशी झळ बसली नसेल. परंतु ज्यांचा दैनंदिन प्रवास केवळ एसटी बसवरच अवलंबून आहे त्यांचे काय? गेल्या कित्येक दिवसापासून त्यांचा प्रत्येक वेळी खोळंबा होत आहे हे दुर्लक्षून चालणार नाही. ग्रामीण भागात याचे अधिक परिणाम जाणवले. सरकार आणि कर्मचार्‍यांमध्ये तोडगा निघून संप मिटावा याकरिता अनेकांनी देव पाण्यात ठेवले असतील.

बसअभावी सर्वाधिक परिणाम झाला तो विद्यार्थी आणि नोकरदारांवर. याचा अर्थ असा नाही की, इतरांना त्याचा फरक नाही पडला. परंतु विद्यार्थी मग ते शालेय असो किंबहुना महाविद्यालयीन असो. करोना महामारीच्या दीड वर्षांच्या कालावधीनंतर आताच काही दिवसांपूर्वी शाळा, कॉलेज सुरू झाले. परंतु विद्यर्थ्यांना दररोज शाळेत अथवा कॉलेजमध्ये ये-जा करणे बसविना जवळजवळ अशक्य बनले आहे. स्पर्धा परीक्षा, अन्य परीक्षा, खासगी क्लासेस अथवा इंटरव्ह्यूसाठी जाताना विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना होत आहे. परगावी नोकरीस असणार्‍या कर्मचार्‍यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. दररोज नोकरीच्या ठिकाणी बसने प्रवास करणार्‍या लाखो कर्मचार्‍यांना आणि कॉलेजला जाणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांना एसटी बस म्हणजे मोठा आधार आहे. तो आधार गेल्या कित्येक दिवसांपासून एकाच जागेवर उभा आहे. लालपरी थोडीसुद्धा जागची हलली नाही.

हा झाला विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाच्या हालअपेष्टांचा विषय. दुसरीकडे व्यापार आणि व्यवसायांवर देखील याचा परिणाम ठळकपणे जाणवला. एका गावाहून दुसरीकडे खरेदी करण्यासाठी बसने ये-जा करणार्‍या ग्राहकांनाही थांबून राहावे लागले. त्यामुळे खरेदी-विक्री व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचे व्यापारी, दुकानदार सांगतात. बस नसल्याने बर्‍याच ठिकाणी गैरसोय झाल्याचे शेतकरीदेखील सांगतात.

याखेरीज कोणत्याही कामासाठी, प्रवासाकरिता ज्यांना निव्वळ आणि निव्वळ बसचाच सहारा आहे, त्यांची तर दैनंदिन घडी मोठ्या प्रमाणात विस्कटली. दवाखाना असो अथवा कोणतेही खासगी काम ते बसअभावी त्यांना थांबवून ठेवावे लागले. यास अपवाद आहे ज्यांच्याकडे खासगी वाहने आहेत त्यांचा. मात्र ज्यांचे दळणवळणाचे अवलंबित्व पूर्णतः लालपरीवरच आहे त्यांची मोठी गैरसोय झाली.

थोडक्यात लालपरी प्रदीर्घ काळाकरिता थांबल्याने त्याचे विविधांगी परिणाम सर्वसामान्य जनमाणसावर झाले. लवकरात लवकर यावर निर्णय व्हावा आणि लालपरी पूर्ववत रस्त्यावर धावावी. ओस पडलेली बस स्थानके प्रवाशांच्या सहवासाने फुलावी. दैनंदिन गैरसोय दूर व्हावी. हीच आकांक्षा...

कोल्हार भगवतीपूरच्या विस्तीर्ण बाजारपेठेत आजूबाजूच्या असंख्य गावांतून, तालुक्यातून तसेच परजिल्ह्यातून ग्राहक येथे वेगवेगळी खरेदी करण्यासाठी येत असतो. मात्र बसेस बंद असल्याकारणाने त्याचा फटका कमी-अधिक प्रमाणात व्यापार, व्यवसायाला बसतो. सर्वच ठिकाणच्या बाजारपेठांवर याचे विपरीत परिणाम जाणवले. बसचे दळणवळण पूर्णतः खंडित झाले. बसने खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांची संख्या रोडावली. जांच्याकडे खासगी वाहन आहे, ते बाजारपेठेत ये-जा करू शकतात. मात्र इतरांना काही पर्याय नाही. व्यापाराबरोबरच लग्नकार्यात देखील याचे परिणाम उमटत आहेत. काहींना इच्छा असूनही बस नसल्याने विवाहस्थळी जाता येत नाही.

- अनिल कोळपकर, व्यावसायिक, कोल्हार भगवतीपूर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com