हेवेदावे विसरून एकदिलाने काम करा आम्ही सर्व तुमच्या पाठीशी : ना. गडाख

हेवेदावे विसरून एकदिलाने काम करा आम्ही सर्व तुमच्या पाठीशी : ना. गडाख

राहाता (प्रतिनिधी) / Rahata - शिवसंपर्क अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेतील हेवेदावे चव्हाट्यावर आले आहेत. सरकार असताना शाखाप्रमुखांनी सांगितलेली कामे होत नसल्याने 15 शाखाप्रमुख नाराज असल्याचे एका शाखाप्रमुखाने भर बैठकीत सांगितले. ना. गडाखांनी शाखा प्रमुखांच्या भावना लक्षात घेता छोटे-मोठे हेवेदावे विसरून एकदिलाने समाजाचे काम करा, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही शाखाप्रमुखांना दिली.

राहाता तालुक्यात शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. तालुका शिवसेनेच्यावतीने ना. गडाख यांचे फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले. राहाता नगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमासाठी खा. सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे, शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, धनंजय गाडेकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे,

जिल्हा संघटक विजय काळे, नाना बावके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे, ज्येष्ठ नेते अशोक थोरे, राजेंद्र अग्रवाल, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे मुकुंद सिनगर, भारतीय कामगार सेनेचे डी. डी. पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय शिंदे, उपतालुकाप्रमुख भास्करराव मोटकर, राहाता शहरप्रमुख गणेश सोमवंशी, शिर्डी शहरप्रमुख सचिन कोते, युवा सेनेचे प्रताप निर्मळ, अमोल गायके, रवींद्र सोनवणे, महेश कुलकर्णी, सुभाष उपाध्ये, भागवत लांडगे, अनिल पवार, जयराम कांदळकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी शिवसेनेचे सुहास वहाडणे, कमलाकर कोते, नानासाहेब बावके, विजय काळे आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे राहाता नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, नगरसेवक डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी स्वागत व सत्कार केला.

शिवसेना हा लढवय्या पक्ष आहे. शिवसेनेत मला वेगळा अनुभव मिळाला. पक्षाने जो विश्‍वास दाखवला त्यास मी कधीही तडा जावू देणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेत प्रामाणिक व सरळपणा आहे. असा प्रामाणिकपणा राजकारणातून विरळ झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांनी शिवसैनिकांना शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जावून जनतेच्या समस्या सोडवण्याचे आवाहन केले आहे ते आपण प्रभावीपणे राबवू या. राजकारणात अनेकदा संघर्ष करावा लागतो. छोटे-मोठे हेवेदावे बाजूला ठेवा. समाजाचे काम करा, तुम्हाला नक्की न्याय मिळेल. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत.

- शंकरराव गडाख, जलसंधारण मंत्री

मला जनतेने दोन वेळा खासदार केले. यात शिवसैनिकांचे मोठे योगदान आहे. शिवसैनिकांनी जनतेची आणलेली कामे करण्यास मी सदैव तत्पर आहे. 15 शाखा प्रमुख का नाराज आहे ते मला माहित नाही पण अडचण असेल तर त्यांची समस्या सोडवू. मला कोणाचेही काम अडवायचे नाही. शाखाप्रमुखांनी पिकविम्याचा प्रश्‍न उपस्थित केला. 2018 साली जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 169 कोटींचा फळबाग पिकविमा मिळवून दिला. मतदार संघातील अनेक नगरपालिकांना स्व. बाळासाहेब ठाकरे योग भवनासाठी प्रत्येकी 80 लाख निधी दिला. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिका निवडणुका आहेत. त्यासाठी जोमाने कामाला लागा. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेची कामे करा.

- खा. सदाशिव लोखंडे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com