अवैध धंदे बंद करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा

अवैध धंदे बंद करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा

अन्यथा राहुरी फॅक्टरीवर चौकात चक्काजामचा इशारा

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे सुरू असलेले अवैध धंदे त्वरीत बंद करावेत. यासाठी फॅक्टरी परिसरातील महिलांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे. तसेच येत्या 48 तासात अवैध बंद झाले नाहीतर नगर-मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसाद नगर भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे या परिसरातील अनेक प्रपंच उद्धस्त झाले आहेत. दारूच्या आहारी जाऊन अनेकजण मयत झाले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर दारू व्यवसायासह बेकायदेशीर सावकारी व्यवसाय सुरू आहे. अवैध व्यवसायीक हे गुंड प्रवृत्तीचे असल्याने परिसरात नेहमीच दहशतीचे वातावरण असते. तसेच काहींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळच हातभट्टी व्यवसाय सुरू केला. त्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे.

याबाबत वेळोवेळी स्थानिक पोलीस प्रशासनाला लेखी व तोंडी स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र, स्थानिक पोलीस प्रशासन व अवैध व्यवसायिकांचे आर्थिक हितसंबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. येत्या 48 तासात प्रसादनगर भागातील दारू व्यवसाय व बेकायदा सावकारी बंद न केल्यास 15 जुलै रोजी राहुरी फॅक्टरी येथील आंबेडकर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार, असे राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी मालती कदम, ताईबाई बोरडे, सुवर्णा मोकळ, शोभा पाटोळे, पल्लवी पवार, येलन गायकवाड, रंगूबाई मोकळ, अलका पठारे, कविता साळवे, सिंधू शेलार आदी महिला उपस्थित होत्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com