सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुक्यातील सुपा येथील पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन सर्वरडाऊन असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याकारणाने

पोलीस महिला कर्मचारी भिमाबाई रेपाळे यांचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी सोमवार (दि.29) पहाटे सुपा पोलिस स्टेशनला पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, रविवार 27 रोजी पोलीस कर्मचारी रेपाळे या सुपा पोलीस स्टेशनला रात्रपाळी ड्युटीवर असताना सुपा येथील बन्सी रामचंद्र कांबळे (रा. इंदिरानगर मराठी शाळेजवळ सुपा) हे त्यांची मुलगी शिवानी बन्सी कांबळे, तेजश्री बन्सी कांबळे तसेच मंदा संपत गांगुर्डे (रा. सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई) तसेच अशोक पिराजी जाधव (रा. सुपा) हे रात्री 11.30 वाजता फिर्याद देण्यासाठी आले.

त्यांची फिर्याद घेण्याचे काम चालू असताना अचानक ऑनलाईन सर्वर डाऊन झाले. त्यामुळे फिर्याद घेण्यास विलंब होत होता. त्यावेळी पाचही आरोपींनी आमची फिर्याद घेण्यास टाळाटाळ का करतात असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यादरम्यान कर्मचारी रेपाळे या शिवानी कांबळे, तेजश्री कांबळे व त्यांची पाहुणी मंदा संपत गांगुर्डे यांना समजावून सांगत असताना त्याचा राग येऊन त्यांनी वाईट शब्द बोलून शिवीगाळ करत तुझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तुझी नोकरी घालवते असे म्हणत अंगाला झटून शिवानी कांबळे हिने दोन्ही हाताने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व तेजश्री कांबळे व मंदा गांगुर्डे या दोघांनी मारहाण करून जखमी केले.

तसेच बन्सी कांबळे व अशोक जाधव यांनी त्यांना सहाय्य करत सरकारी कामात अडथळा आणला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून या पाच आरोपींविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितींकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कसे करत आहेत.