केंदळ खुर्दला रस्ते,पाण्यासाठी महिलांचा उपोषणाचा पवित्रा

केंदळ खुर्दला रस्ते,पाण्यासाठी महिलांचा उपोषणाचा पवित्रा

आरडगाव (वार्ताहर) / Aradgaon - राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांकडून गावातील समस्या सुटत नसल्याने दि.15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांसह ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

गावातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले अंतर्गतरस्ते, पिण्याचे व वापराचे पाणी, नादुरुस्त पाण्याची टाकी, बंदिस्त गटार योजना, प्रलंबित घरकुल प्रश्‍न, पिण्याच्या पाण्यावरील अनाधिकृत इलेक्ट्रीक मोटारी बंद करण्यात याव्या, या बाबतचे ग्रामपंचायकडे लेखी निवेदन देण्यात आले होते.

पंरतु कुठलेही उत्तर न मिळाल्याने राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे माणिक आढाव, गहिनीनाथ राशिनकर, प्रकाश आढाव, सचिन गुंजाळ, रवींद्र गुंजाळ, दीपक आढाव, विजय आढाव, बाबासाहेब आढाव, सोमनाथ झिने, लक्ष्मण जाधव, लहानू जाधव, सुरेश जाधव, गुलाब गोलवड, विलास मोरे, ताराचंद केदारी, बबन केदारी, सुरेश गोलवाड, अनिल माळी, विजय आढाव, किशोर जाधव, भरत माळी, सुनील जाधव, इंदुबाई केदारी, अनिता पाटोळे, ताई आढाव, संगीता मनतोडे, सुरेखा जाधव, संगीता केदारी आदी महिलांसह ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

घराकडे येण्यासाठी रस्ता नाही. पाऊस झाल्यावर सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. घरासमोर घाण वास येतो. साचलेले पाणी बाहेर काढून देण्यासाठी जागा नाही. ग्रामपंचायतीने रस्ता, नाल्याची सोय करून द्यावी.

- अनिता पाटोळे, केंदळ खुर्द

लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले. एकदाही पाणी प्यायला मिळाले नाही. गोड पाणी दिवसाआड येते. गावातील सार्वजनिक हापशा बंद असल्याने वापरण्यासाठी पाणी नाही. टाकी दुरुस्त करून पाण्याची सोय करून द्यावी.

- इंदुबाई केदारी, केंदळ खुर्द

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, यांच्याकडे वेळोवेळी लेखी निवेदन देऊन देखील रस्ता, पाणी, पाण्याची टाकी, नाल्या, घरकुल, या गोष्टीकडे ग्रामपंचायत पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. ही कामे लवकरात लवकर मार्गी न लावल्यास 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे.

- विरेश सुभाष आढाव, केंदळ खुर्द

रहायला घर नाही. पावसाळ्यात छपराची घरे गळत आहेत. चार वर्षांपासून घरकुल मंजूर झाले. पण जागा नावावर नाही म्हणून आतापर्यंत घरकुल मिळाले नाही. आमच्या जागा नावावर करून आम्हाला घरकुल बांधून द्यावे.

- लक्ष्मण जाधव, घरकुल लाभार्थी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com