पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेने दुसर्‍या महिलेस मिठी मारली, 5 जणांविरुद्ध गुन्हा

पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेने दुसर्‍या महिलेस मिठी मारली, 5 जणांविरुद्ध गुन्हा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

जुन्या भांडणाच्या कारणातून शहरातील अकोले नाका परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी आणखी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेने दुसर्‍या महिलेस जीवे मारण्यासाठी मिठी मारल्याने या महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अकोले नाका परिसरात दोन दिवसापूर्वी ही घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पेटलेल्या महिलेने मिठी मारल्याने भाजलेल्या संध्या विलास खरे (रा. लालतारा वसाहत, संगमनेर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत खरे यांनी म्हटले आहे की, अकोले नाका परिसरातून जात असताना मथुरा सूर्यवंशी (रा. अकोले नाका) या महिलेने मागील भांडणं मिटवून घेवू म्हणून बोलावले.

यावेळी तेथेच राहणार्‍या परिघा सूर्यवंशी या महिलेने आपल्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर मथुरा सूर्यवंशीसह अन्य दोन महिला व दोन पुरुषांनी पकडून ठेवले. दरम्यान परीघा सूर्यवंशी यांनी स्वतःच्या हाताने पेट्रोलची बाटली आपल्याच अंगावर ओतून पेटवून घेतले व आपणास मिठी मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी जखमी फिर्यादी संध्या खरे यांच्या फिर्यादीवरुन मथुरा सूर्यवंशी, परीघा सूर्यवंशीसह चार अनोळखी अशा सहा व्यक्तींविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 295/2022 भारतीय दंड संहिता कलम 307, 323, 143, 147 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाणे करत आहे.

Related Stories

No stories found.