अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ग्रामीण भागात अनेक गावात बांधकाम साहित्य सहजासहजी उपलब्ध होत नाही. यामुळे अनेकांना तालुक्याच्या गावाला

अथवा बड्या गावांना बांधकामासाठी आवश्यक असणारे स्टिल, सिमेंटसह विटा आणि अन्य साहित्य खरेदीसाठी जावे लागते. यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पुढाकारातून जिल्ह्यातील प्रत्येक झेडपी गटात आता बचत गटांच्या मार्फत घरकुल (बांधकाम) साहित्याचे मार्ट सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी हे मार्ट सुरूही झाले आहेत. यामुळे घरकुलाचे बांधकाम करणार्यांना एकाच छताखाली वाजवी दरात आता बांधकाम साहित्य उपलब्ध होणार आहे.

जिल्हा 100 दिवसांचे महाआवास अभियान सुरू आहेत. त्यात मंजूर घरकुलांपैकी अधिका अधिक घरकुले बांधून पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून घरकुल योजनेला वेग यावा आणि महिला बचत गटांना देखील काम मिळावे, यासाठी बचत गटातील महिलांना बांधकाम साहित्य विक्रीचे मार्ट सुरू करण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे. त्यानूसार काही बचट गटांच्या महिलांनी या व्यवसायात पर्दापणही केले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव या ठिकाणी, संगमनेर तालुक्यात तिन ठिकाणी, नगर तालुक्यातील शिंगवे या ठिकाणी हे मार्ट कार्यान्वित झालेले आहेत. तर अन्य दोन ठिकाणी ते प्रस्तावित आहेत.

नगर जिल्ह्याला बचत गटाला मोठी चळवळ आहे. जिल्ह्यातील अनेक महिला बचत गटातील महिलांनी यशस्वीपणे वाटचाल करत बचत गटांच्या माध्यमातून आपल्या संसाराला आर्थिक हातभार लावण्यासोबतच अन्य गरजवंत महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यात सध्या महाआवास योजना सुरू असून अनेक ठिकाणी घरकुल उभारणी (बांधकामासाठी) लाभार्थ्यांना साहित्य खरेदीसाठी मोठ्या अथवा तालुक्याच्या गावाला जावे लागत आहे.

यावर उपाय म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात महिला बचत गटांचे बांधकाम साहित्य मार्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा दुहेरी फायदा होणार असून घरकुलांच्या लाभार्थ्यांना सहजासहजी वाजवी दरात हे साहित्य मिळणार असून बचत गटांना देखील नवा व्यवसाय मिळणार आहे.

14 ठिकाणी घरकुलाची प्रतिकृती साकारणार

जिल्ह्यात 14 पंचायत समितीच्या आवारात घरकुलांची खरीखूरी प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. घरकुल कसे बांधावे, याचा नमुना लाभार्थ्यांना समजावा, यासाठी हा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकी 1 लाख 40 हजार रुपये घरकुलासाठी, 78 हजार रुपये गवंडी प्रशिक्षणासाठी आणि 50 हजार रुपये शोषखड्डे, परसबाग आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी स्वतंत्रपणे तरतुद करण्यात आली आहे. 14 पंचायत समितीमध्ये बांधण्यात येणारी घरकुलाची प्रतिकृती ही 269 स्वेअर फुटाची राहणार आहे.