
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील येळी येथे वादातून दोघी बहिणी व त्यांच्या आईवर दोघांनी कुर्हाडीने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि.29) पहाटे घडली. नामदेव अंबादास बडे (रा. येळी, ता. पाथर्डी) व अतुल पोपट कुंदे (रा. कोळसांगवी, ता. पाथर्डी) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
तर या घटनेत लताबाई बापु हिंगे व सारीका बापु हिंगे तसेच कविता शरद घुगे (रा. येळी. ता. पाथर्डी) अशी यामध्ये जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. या प्रकरणी कविदा शरद घुगे (रा. येळी. ता. पाथर्डी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास हिंगे या त्यांची आई लताबाई व बहिण सारीका यांच्या समवेत घराच्या पडवीमध्ये झोपलेल्या असताना तेथे अचानक आलेल्या संशयित नामदेव बडे व अतुल पोपट कुंदे यांनी त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर कुर्हाडीने हल्ला केला.
यामध्ये तीघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पाथर्डी येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी अहमदनगर येथे दाखल करण्यात आले आहे. कविता घुगे यांच्या तक्रारीवरून संशयितांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास उपनिरिक्षक श्रीकांत डांगे करत आहेत.