तीन महिलेकडील सहा तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरले

गुलमोहर रोडवरील संत्सग कार्यक्रमातील घटना
तीन महिलेकडील सहा तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवर असलेल्या कोहिनुर मंगलकार्यालयातील संत्सग मेळाव्यास उपस्थित असलेल्या तीन महिलेच्या गळ्यातील सुमारे सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने महिला चोरट्यांनी लंपास केले. बुधवारी सायंकाळी साडेचार ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पुष्पा विष्णु मिसाळ (वय 70 रा. सिध्दीविनायक कॉलनी, सावेडी) व प्रमिला अनिल खर्पे (वय 57 रा. अयोध्यानगर, पाईपलाईन रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान आणखी काही महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेल्याचे समजते. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरूवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. बुधवारी गुलमोहर रोडवरील कोहिनुर मंगलकार्यालयात सायंकाळी चाडेचार वाजता श्री.स्वामी समर्थ महाराज यांचा संत्सग कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी पुष्पा मिसाळ उपस्थित होत्या. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कार्यक्रम सव्वा आठ वाजता संपल्यानंतर पुष्पा मिसाळ या प्रसाद घेण्यासाठी उठल्या. त्याच वेळी त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण एका महिलेने चोरले.

दरम्यान त्यांच्या जवळ असलेल्या सुनीता बाळकृष्ण बत्तुल (वय 45 रा. भिस्तबाग चौक, सावेडी) यांच्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळ्याचे गंठण संबंधीत महिलेने चोरले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गंठण चोरी झाल्याचा प्रकार मिसाळ व बत्तुल यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. प्रमिला खर्पे या देखील या संत्सग सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. त्यांच्या गळ्यातील आठ ग्रॅमचे मिनी गंठण चोरीला गेले. त्यांनी यासंदर्भात गुरूवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com