रिपोर्ट चांगला अन् पूर्ण पगार हवा असेल तर चहापाण्याची सोय करा

महिला पोलिसांकडून एका पोलिसाला ‘ब्लॅकमेलिंग’
रिपोर्ट चांगला अन् पूर्ण पगार हवा असेल तर चहापाण्याची सोय करा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

गैरहजेरीच्या कालावधीतील रिपोर्ट चांगला हवा असेल तर तुम्हाला आमच्या चहापाण्याची सोय करावी लागेल नाहीतर तुमचे नुकसान होईल’ अशा शब्दांत पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील दोघा महिला पोलीस कर्मचार्‍यांनी एका पोलीस कर्मचार्‍याला ब्लॅकमेलिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचार्‍याने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे निनावी पत्राद्वारे तक्रार केली आहे. धमकी देणार्‍या महिला पोलीस कर्मचार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी निनावी पत्रात केली आहे.

संगमनेर येथील पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे प्रकार सुरू असतात. यापूर्वी कर्मचार्‍यांमधील गटबाजीही उघडकीस आली आहे. मर्जीतील कर्मचार्‍यांना सोयीनुसार काम देण्यात येत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सदर पोलीस कर्मचार्‍याने नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या नावे तक्रार करून संबंधित महिला कर्मचार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे संगमनेर पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सदर तक्रार करणारा पोलीस कर्मचारी संगमनेर विभागातील एका पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. त्याची सातत्याने पोलीस उपअधीक्षक कार्यालयात विविध कामानिमित्त ये-जा असते. या कार्यालयातील दोन महिला पोलीस कर्मचारी या कर्मचार्‍यास हीन वागणूक देत असून वेळोवेळी एका पोलीस कर्मचार्‍यांवर ओरडून अपमान करत आहे. सदर पोलीस कर्मचारी काही दिवस गैरहजर होता.

पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर हा कर्मचारी संबंधित दोन महिला कर्मचार्‍यांना भेटला. गैरहजेरीच्या काळातील रिपोर्ट चांगला हवा असेल तर आमच्या चहापाण्याची सोय करा, असे या दोन महिला पोलीस कर्मचारी म्हणू लागल्या.मी गैरहजर आहे त्याचा पगार देखील नाही तर मी तुमची सोय कशी करू असे हा कर्मचारी म्हणताच पोलीस उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील एक महिला कर्मचारी म्हणाल्या, रिपोर्ट चांगला पाहिजे असेल आणि पगार पूर्ण पाहिजे असेल तर चहापाणी करावाच लागेल, नाही तर तुमचे नुकसान होईल.

या तक्रार अर्जात पुढे म्हटले आहे की, ह्या महिला इन्स्पेक्शन नावाखाली पोलीस ठाण्यात येतात आणि पाकीट, हॉटेल जेवण, बसस्टँडपर्यंत सोडवायला गाडीची सोय करण्याचा हट्ट करतात. अन्यथा वरिष्ठांपर्यंत तुमच्याविरुद्ध चुकीचे रिपोर्ट पाठवले जाईल, अशी धमकी या दोन महिला पोलीस कर्मचारी देतात. त्यांच्याविरुद्ध कोणी बोलत नाही. कार्यालयाचा कारभार त्यांच्या हातात असल्याने पोलिसांना आरे कारे आणि दडपशाहीची वागणूक या दोन महिला पोलीस कर्मचारी देतात, असे या तक्रार अर्जात म्हटले आहे. जर असेच चालू राहिले तर कोणी तरी पोलीस कर्मचारी आपले जीवन संपवून टाकीन त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लवकर लक्ष घालावे, असे या अर्जात नमूद केले आहे.

श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे हा तक्रार अर्ज आल्यानंतर त्यांनी तो चौकशीसाठी संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षक यांच्या कार्यालयाकडे पाठविला. मात्र हा तक्रार अर्ज निनावी असल्याने पोलीस उपाधिक्षकांनी तो तात्काळ निकाली काढला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तक्रार करूनही तक्रारदार पोलिसाला कुठलाही न्याय मिळाला नाही.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी असा प्रकार घडला होता. ड्युटीवर असलेल्या एका कर्मचार्‍याने आपल्या मर्जीतील एका महिला कर्मचार्‍याला सोयीची ड्युटी दिली होती. यावेळी त्याने इतर कर्मचार्‍यांवर अन्याय केला होता. याबाबतही संबंधितांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक नवीन प्रकार उघडकीस आला आहे. राज्यामध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून काही पोलीस कर्मचार्‍यांनी यापूर्वी आत्महत्या केल्या आहेत. संगमनेरमध्ये असाच प्रकार होत असल्याने यातून काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com