
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महिलेचा खून करून मृतदेह रेल्वे स्टेशन भागात मोकळ्या पडीक शेतामध्ये आणून टाकल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. ‘त्या’ महिलेची ओळख पटली असून तिचे खूनी मात्र पोलिसांना अद्याप मिळालेले नाही. स्थानिक गुन्हे शाखेसह कोतवाली पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. सिमा सुमेंद्रराम पटेल (वय 33 रा. कोरवा, छत्तीसगड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
29 नोव्हेंबर रोजी इंगळे वस्ती, रेल्वेस्टेशनच्या पश्चिमेस असणार्या मोकळ्या पडीक शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सदर महिलेच्या मृतदेहा शेजारी एक सिमेंट ब्लॉक पडलेला होता. जिल्हा शासकीय रूग्णालयात महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता महिलेचा मृत्यू डोक्यात मार लागून झाल्याचा अहवाल देण्यात आला. यावरून पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या पथकांनी ‘त्या’ महिलेची ओळख पटविली. तिचा खून कोणी केला यासंदर्भात त्यांच्याकडून तपास सुरू आहे. मुळची छत्तीसगड येथील सिमा पटेल हिचा प्रेमविवाह धुळे जिल्ह्यातील ज्ञानेश्वर पाटील सोबत झाला होता. ते दोघे लोणावळा (जि. पुणे) येथे राहत होते.
दरम्यान सिमा ही बेपत्ता झाल्याची तक्रार लोणावळा पोलीस ठाण्यात दाखल होती. त्यानंतर तिचा शोधही लागला होता. पुन्हा ती एप्रिल, 2021 मध्ये बेपत्ता झाली होती. यासंदर्भात तिचा पती ज्ञानेश्वरने लोणावळा पोलिसांना माहिती दिली होती. तक्रार मात्र दिली नव्हती. दरम्यान नोव्हेंबर, 2022 मध्ये तिचा मृतदेह कोतवाली पोलिसांच्या हद्दीत मिळून आल्याने पोलिसांनी सुरूवातीला तिची ओळख पटविली. तिचे नाव सिमा पटेल असल्याचे समोर आले. पोलीस तिच्या पती ज्ञानेश्वरपर्यंत पोहचले. त्यांनी चौकशीकामी ज्ञानेश्वरला ताब्यात घेतले. त्याचा जबाब देखील नोंदविला. त्याच्या जबाबातून ती बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. ज्ञानेश्वरकडे चौकशी केल्यानंतरही पोलिसांना सिमाच्या मारेकर्यापर्यंत पोहचता आलेले नाही.
दरम्यान ज्ञानेश्वरचा जबाब कोतवाली पोलिसांनी नोंदविला असला तरी स्थानिक गुन्हे शाखेकडून त्याची स्वतंत्र चौकशी केली जाणार असल्याची माहिती समजते. सिमाचा खून झाला असून तिचे मारेकरी अद्याप सापडले नाही. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
पोलिसांचे आव्हान
सिमाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांच्या हाती एक डायरी लागली होती. त्यात बांधकाम विषयी मजकूर आढून आला आहे. यावरून ती बांधकाम ठेकेदाराकडे काम करत असल्याचे समोर आले आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील बांधकाम ठेकेदारांना सिमा पटेल नावाच्या महिलेविषयी काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आव्हान पोलीस निरीक्षक संपत शिंदे, उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी केेले आहे.
अंगावर भाजलेल्या खूना
सिमाचा मृतदेह मिळून आल्यानंतर तिच्या अंगावर भाजलेल्या खूना दिसून आल्या होत्या. यावरून तिचा मृत्यू होण्यापूर्वी ती भाजली असल्याचे दिसून येते. तिने नगर शहरात उपचार घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी काही रूग्णालयांशी संपर्क साधून सिमा पटेल नावाच्या महिलेने कुठे उपचार घेतले का? याची माहिती मागितली आहे.
सिमा होती गर्भवती
सिमाचा मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर ती तीन महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले. यासंदर्भात पोलिसांनी गर्भाचा डीएनए तपासणीसाठी नाशिक येथे पाठविला आहे. त्याचा अहवाल प्रतिक्षेत आहे.