संगमनेर येथील नामांकित रुग्णालयातील व्यवस्थापकाकडून महिलेचा विनयभंग

कपडे बदलताना महिलेचे फोटो काढले; आरोपीस अटक
Crime
Crime

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील नवीन नगर रोड परिसरातील एका नामांकीत रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने रुग्णालयात काम करणार्‍या एका महिला कर्मचार्‍याचे ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलत असताना फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत या महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील नवीन नगर रोड परिसरातील खाजगी रुग्णालयातील महिला काम करत असताना या रुग्णालयाचा व्यवस्थापक निजाम शेख हा सदर महिलेशी जवळीक करून तु मला आवडते असे महिलेला नेहमी म्हणत. ही महिला निजाम शेख याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत. निजाम शेख याचे चाळे बंद झाल्याने संतापलेल्या या महिलेने त्याची कानउघाडणी करत आपण डॉक्टरांकडे तक्रार करू असे तिने शेख यास सांगितले. निजाम शेख हा त्रास देत असल्याने पिडीत महिला एक महिन्यासाठी रजेवर निघुन गेली. पुन्हा कामावर हजर झाल्यानंतर महिलेला हॉस्पिटलमध्ये सोडवण्यासाठी तिचा नवरा येत असे.

सदर महिला रुग्णालयातील ड्रेसिंगरूममध्ये कपडे बदलत असताना निजाम शेख याने फोटो काढून घेतले. शेख याने सदर महिलेला हॉस्पिटलच्या कामानिमित्ताने बोलावून तिच्या गालावरून हात फिरवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तु बाहेर कुठे तरी चल, तु नाही आली तर तुझे फोटो व्हायरल करीन व तुझ्या नवर्‍याला फोटो पाठवीन अशी धमकी देऊन आरोपी निजाम शेख याने पीडित महिलेला एका लॉजवर बोलवले. हॉस्पिटल मधील कपडे काढत असतानाचे फोटो दाखवले.

तु माझ्यासोबत लॉजमध्ये आली नाही तर तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी त्याने दिली. शेख याच्या त्रासाला कंटाळून महिलेने हॉस्पिटलची नोकरी सोडून दिली. यानंतरही तो या महिलेस त्रास देत होता. यानंतर संतापलेल्या या महिलेने शहर पोलीस ठाणे गाठून शेख याच्याविरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी निजाम चाँदभाई शेख राहणार रेहमतनगर, संगमनेर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी निजाम शेख यास अटक करण्यात आली असून न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com