महिलेचा विनयभंग करणार्‍यास सक्त मजुरी

जिल्हा न्यायालयाचा निकाल
महिलेचा विनयभंग करणार्‍यास सक्त मजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी विशेष न्यायालय तथा जिल्हा न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांनी आरोपी कैलास दत्तात्रय गर्जे (रा. गर्जेवस्ती, पाडळी, ता. पाथर्डी) यास भा.दं.वि. कलम 354 नुसार दोषी धरून एक वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास तीन महिने कैद अशी शिक्षा ठोठावली. सदर सत्र खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील अ‍ॅड. सी. डी. कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.

या घटनेची थोडक्यात हकिगत अशी की, पीडित महिलेचा शेतात 29 जून, 2018 रोजी बाजरीच्या पेरणीचे काम करण्यासाठी कैलास दत्तात्रय गर्जे हा ट्रॅक्टर घेऊन आला होता. पेरणी पूर्ण झाल्यानंतर महिलेने त्यास पेरणीचे किती पैसे द्यायचे, असे विचारले असता,‘तीन हजार रुपये’, असे त्याने सांगितले; पण,‘मला तुझ्याकडून पैसे नको’, असे म्हणून त्याने महिलेचा विनयभंग करून तिस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत दमदाटी केली.

तसेच सदर प्रकाराबाबत महिलेचा भाऊ व मुलगा यांनी कैलास गर्जे यास विचारणा केली असता त्याने त्यांना देखील दमदाटी केली. म्हणून कैलास गर्जे याचे विरूध्द पीडित महिलेने पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भादंवि कलम 354, 506 सह अनसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे, सहायक पोलीस निरीक्षक वाय.एस. राक्षे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार एम.ए.थोरात व ए.आर. भिंगारदिवे यांनी सहकार्य केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com